Advertisement

विद्यार्थीनींना कॉलेजनं शुल्क मागितल्यास होणार कारवाई

प्रजापत्र | Tuesday, 13/08/2024
बातमी शेअर करा

मुंबई : राज्य सरकारनं विद्यार्थीनींना पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण मोफत केलं आहे. त्यामुळं आता महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी मुलींना शुल्क भराव लागणार नाही. मात्र, तरीही काही महाविद्यालये त्यांच्याकडून शुल्क वसूल करत आहेत, अशा तक्रारी आल्या आहेत. याविरोधात आता उच्च व तंत्रशिक्षण विभागानं कडक पावलं उचलली आहेत. त्यानुसार, जी महाविद्यालये विद्यार्थींनीकडं शुल्क मागतील त्यांच्याविरोधात तक्रारींसाठी हेल्पलाईन क्रमांक प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

 

 

यासंदर्भात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयानं ट्विट करुन माहिती दिली आहे. यामध्ये म्हटलं की, मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत समस्या आल्यास सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत 07969134440 आणि 07969134441 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच http://helpdesk.maharashtracet.org या हेल्पलाइन तिकीट लाईनवरही संपर्क साधता येईल, असं आवाहन उच्च व तंत्रशिक्षण विभागानं केलं आहे.

 

 

काय आहे योजना?
महाराष्ट्र सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागानं ही योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार, या वर्षीपासून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना ट्युशन आणि परीक्षा फीमध्ये शंभर टक्के सवलत जाहीर केली आहे. यामुळं सहाजिकच संपूर्ण फी माफ असणार आहे. पण यासाठी पालकांचं उत्पन्न हे ८ लाखांपेक्षा कमी असणं गरजेचं आहे. या उत्पन्नापेक्षा अधिक उत्पन्न असल्यास विद्यार्थींनी पूर्ण फी भरावी लागणार आहे.

 

 

योजनेचा हेतू काय?
विद्यार्थीनींनी फी माफी करण्यामागं सरकारचा विशिष्ट अजेंडा आहे. त्यानुसार, मुलींची व्यावसायिक शिक्षणातील संख्या वाढावी तसंच त्यांना शिक्षण घेण्यात मुलांसारखीच संधी मिळावी. महिला सशक्तीकरणासाठी घेण्यात आलेल्या या पुढाकारामुळं मुलींना केवळ आर्थिक पाठबळ नसल्यानं व्यावसायिक शिक्षणाच्या संधींपासून मुकावं लागू नये, हा यामागचा हेतू आहे.

Advertisement

Advertisement