बीड-राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेले आरोप आणि त्यांनी केलेला खुलासा यामुळे राज्यभरात खळबळ माजली आहे. भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह गाव पातळीवर कार्यकर्ते मात्र धनंजय मुंडेंच्या समर्थनात उतरले आहेत. बुधवारी दिवसभर सोशल मीडियावर ‘आय सपोर्ट डीएम’ हा ट्रेंड जोर धरत होता.
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मात्र त्या आरोपांना धनंजय मुंडे यानंी स्वत:च्या फेसबुक पेजवरुन दिलेेले उत्तर धोबीपछाड मानले जात आहे. धनंजय मुंडेंनी आरोप करणार्या महिलेच्या बहिणीसोबतचे संबंध जाहीरपणे कबूल करुन तिच्यापासूनच्या अपत्यांनाही आपले नाव दिल्याचे स्पष्ट केल्यानंतर ‘धनंजय मुंडेंनी राजकारणात राहूनही एक धारिष्ट्य दाखविले आहे.’ असा सुर सोशल मीडियात लावला जात आहे. ज्या संबंधांबद्दल आज आरोप केला जात आहे, तो आरोप इतके वर्ष का झाला नाही असाही सवाल सोशल मीडियात धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते विचारत आहेत. भाजपकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी राज्यभरात कार्यकर्ते मात्र धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र सोशल मीडियावर दिसत आहे. धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्यासाठी आणि त्यांच्या बदनामीसाठीच आरोप झाले असल्याचे अनेकजण म्हणत आहेत. एखाद्या मंत्र्यांवर अशा प्रकारचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या समर्थनात राज्यभरातून कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर ट्रेंड चालविण्याची ही कदाचीत पहिलीच घटना असावी. आपला धनंजय मुंडेंवर विश्वास आहे असाच सुर कार्यकर्ते लावत आहेत. त्या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीतील कार्यकर्त्या देखील धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभे असल्याचे चित्र सोशल मीडियात आहे.
बातमी शेअर करा