लोकसभा निवडणुकीनंतर बारामतीत राजकीय घडामोडींना वेग आल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात रोज नवीन नवीन घडामोडी घडत आहेत. आता कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे 'आम्हाला बारामतीचा दादा बदलायचा आहे,' अशी मागणी केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना मोठं उधाण आलं आहे. लोकसभेच्या निकालानंतर बारामतीत राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरद पवार बारामतीतील गोविंद बागेत आज सकाळपासून कार्यकर्त्यांना भेटत आहेत.त्यांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. युगेंद्र पवारांचे युवा कार्यकर्ते आज शरद पवारांना भेटले आहेत. यावेळी त्यांनी बारामतीचा दादा बदला, अशी मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. युगेंद्र पवारांचे काम चांगलं असल्याचं स्पष्टीकरण यावेळी कार्यकर्ते देताना दिसले आहेत.
युगेंद्र पवारांचे कार्यकर्ते नेमकं काय म्हणाले?
युगेंद्र पवार हे बारामतीत लक्ष घालत आहेत. लोकांच्या समस्या जाणून त्याच्यावरती मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक नवीन चेहरा तुम्ही बारामतीसाठी द्यावा, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवारांकडे केली आहे. हातवारे करत शरद पवारांनी उमेदवारीची चर्चा करू नका, लवकरच होईल असं म्हणत कार्यकर्त्यांना संयमी राहण्यास सांगितलं आहे.
बारामतीत विधानसभेची मोर्चे बांधणी
बारामतीत विधानसभेची मोर्चेबांधणी सुरु झाल्याचं दिसत आहे. आता विधानसभेसाठी कार्यकर्ते युगेंद्र पवारांसाठी आग्रही असल्याचं दिसत आहे. त्यामुळे बारामतीमध्ये आता विधानसभेसाठी देखील चुरस वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत. गेल्यावर्षी जुलै महिन्यात अजित पवार शरद पवारांविरुद्ध बंड करत महायुतीमध्ये सामील झाले होते. परंतु लोकसभेत त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही, आता काही कार्यकर्ते बारामतीत दादा बदलण्याची मागणी करत असल्याचं समोर आलं आहे.