औरंगाबाद-शिवसेनेसोबत अनेक वर्षांपासून असलेली युती तुटल्यापासून महाराष्ट्रात भाजपासोबत एकही मोठा मित्रपक्ष उरलेला नाही. त्यातच आता राज्यातील छोटे मित्रपक्षही दुरावू लागले आहेत. आता शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनीही भाजपाला इशारा दिला आहे. भाजपाने सन्माानजनक जागा दिल्या तरच युती करू, अन्यथा स्वबळावर लढणार असे संकेत विनायक मेटे यांनी दिले आहेत.
याबाबत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे म्हणाले की, येत्या काळात भाजपाकडून सन्मानजनक वागणूक मिळाली तर आम्ही युती करू. अन्यथा स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी आम्ही केली आहे. तसेच आगामी औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसंग्राम उतरणार आहे. युती झाली किंवा न झाली तरी येथे दोन आकडी नगरसेवक निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही विनायक मेटे यांनी केला.
यावेळी औरंगाबादच्या नामांतरावरूनही विनायक मेटे यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे. केवळ सामनामध्ये किंवा सोशल मीडियात संभाजीनगर लिहिल्यामुळे शहराचं नामांतर होणार नाही. त्यासाठी नोटिफिकेशन काढावं लागतं. सध्या आपलं ठेवायचं झाकून आणि लोकांचं पाहायचं वाकून अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे, असा चिमटाही विनायक मेटे यांनी काढला.
बातमी शेअर करा