Advertisement

राज्यातील सरकार गेल्याने विरोधक सैरभैर झालेत- मुख्यमंत्री शिंदेंची टीका

प्रजापत्र | Wednesday, 24/04/2024
बातमी शेअर करा

हिंगोली- विरोधकांकडे लोकसभा निवडणुकीसाठी मुद्दे नाहीत. राज्यातील सरकार गेल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता बाप एक नंबरी अन् बेटा दस नंबरी असा प्रकार सुरू असल्याचा टोलाही लगावला.

 

 

वसमत येथे महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री शिंदे यांची सभा झाली. यावेळी आमदार राजेश नवघरे, आमदार संतोष बांगर, पाशा पटेल, माजी खासदार अ‍ॅड. शिवाजी माने, राजू चापके पाटील, बी. डी. बांगर, अ‍ॅड. शिवाजी जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्देच नाहीत. राज्यातील सरकार गेल्याने विरोधक सैरभैर झाले असून, ते भ्रमिष्ट झाले आहेत. बाप नंबरी अन बेटा दस नंबरी असे प्रकार सुरु असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचा आरोप त्यांनी केला.

 

 

विरोधकांनी भाषणात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुख्यमंत्र्यांना निच म्हटले. मात्र हा प्रकार मतदार खपवून घेणार नाहीत. माझ्यावर कितीही आरोप केले तरी त्यांचे कामातून उत्तर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधक दरवेळी सरकार पडणार असे म्हणत होते. मात्र त्यांना चांगला ज्योतिषीच मिळाला नाही. सरकार पडले नाही उलट मजबूत झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईसाठी आतापर्यंत 15 हजार कोटी रुपये दिले आहेत. तसेच 122 सिंचन प्रकल्प मंजूर केले आहेत. आता अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले असून, त्याचेही पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला सुचना दिल्या आहेत. राज्यातील शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement