कोणाचे नाव काय असावे, किंवा कोणत्या कुटुंबाने आपल्या अपत्यांची नावे काय ठेवावीत याच्याशी अगदी एक दशकभरापर्यंत इतरांना फारसे काही कर्तव्य नसायचे. मात्र मागच्या दहा वर्षात देश म्हणजे एका धर्माची मक्तेदारी असे समजून वागणारी स्वयंघोषित ठेकेदारांच्या झुंडी समाज माध्यमांवर वाढू लागल्या आणि असल्या झुंडींना मोकाट फिरता येईल असे वातावरण देशात निर्माण झाले आहे, त्यामुळे आता स्वतःच्या अपत्याचे नाव काय असावे याचे देखील स्वातंत्र्य पालकांना राहिलेले नाही आणि असल्या झुंडीच्या मुस्कटदाबीतून अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा किंवा काश्मीर फाईल्ससारख्या चित्रपटांमधून अभिनय केलेला अभिनेता देखील सुटत नाही, यावरूनच असहिष्णुता किती वाढली आहे हे लक्षात येऊ शकते.
काही चित्रपटांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारलेला, काश्मीरफाईल्स सारख्या चित्रपटांमधून कडव्या हिंदुत्वाचे प्रदर्शन करणारा अभिनय केलेला मराठी अभिनेता चिन्मय मांडलेकर याला आणि त्याच्या कुटुंबियांना समाजमाध्यमांवरील झुंडींनी इतके ट्रोल केले की यापुढे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार नाही असा निर्णय चिन्मय मांडलेकरला घ्यावा लागला. अर्थात कोणी ट्रोल केले म्हणून आपण अमुक एक भूमिका, त्यातही छत्रपती शिवाजी महाराजांसारखी व्यक्तिरेखा साकारणार नाही असे म्हणणे म्हणजे थोडं आततायीपणा आहेच. पण या अभिनेत्याला ट्रोल करण्याचे कारण ठरले आहे ते त्याच्या मुलाचे नाव. या मराठी अभिनेत्याने आपल्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याने सध्या समाजमाध्यमांवरील 'ट्रोलधाडी' मांडलेकर कुटुंबाला आपले लक्ष्य करीत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच्या मुलाचे नाव जहांगीर कसे असू शकते असले अजब तर्कट या समाजमाध्यमांवरील 'ट्रोलधाडी'चे आहे, आणि त्यासाठीच मग जाणीवपूर्वक मांडलेकर कुटुंबाला टार्गेट केले जात आहे.
मुळात आपले नाव काय असावे किंवा आपल्या अपत्यांची नावे काय असावीत याच्याशी समाजातील इतरांना काहीच देणेघेणे असण्याचे कारण नाही. अगदी मागच्या एका दशकापर्यंत असल्या गोष्टीत लक्ष घालायला काही अपवाद सोडले तर कोणाला वेळही नव्हता आणि कारणही नसायचे. त्यामुळेच मधल्या काळात हिंदू मुस्लिम संस्कृतीमधील नावे अनेकांच्या घरात दिसू लागली. हिंदू कुटुंबात मुस्लिम संस्कृतीमधील नाव किंवा इस्लामी कुटुंबात हिंदू नावे असायची. अभिनेते, वकील, प्राध्यापक, साहित्यिक, पत्रकार आदी समाजघटक समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न करीत असतात असे मानले जाते, त्यामुळे अशा घटकांमध्ये ही नावे पाहायला मिळायची. मात्र त्यामुळे कोणी कोणाला ट्रोल केल्याचे, नावे ठेवल्याचे प्रकार फारसे घडायचे नाहीत. काही ठिकाणी अपवादाने अशा नावांच्या व्यक्तींना थोडाफार त्रास व्हायचा, मात्र असला 'सनातनी'पणा अर्थातच मोजकाच असायचा. तो सार्वत्रिक झालेला नव्हता. मात्र मागच्या दशकभरात देशातील सारेच वातावरण टोकाचे कलुषित झाले आहे. कोणाचे नाव काय असावे, कोणाचा आहार कोणता असावा, कोणाची वेशभूषा कोणती असावी यावर बंधने टाकण्याचा प्रयत्न जोरकसपणे सुरु आहे. त्यासाठी मग कधी हिंसाचार, कधी समाजमाध्यमांचा माध्यमातून ट्रोल करणे, कधी बहिष्काराची भाषा करणे असले उद्योग काही झुंडी करीत आहेत आणि असल्या मोकाट झुंडींवर कसलीच कारवाई होत नसल्याचेही चित्र आहे. त्यामुळे असल्या समाजमाध्यमी टवाळांचे चांगलेच फावत आहे. मध्यंतरी समाजमाध्यमांवरील एका समूहावर रमजानच्या दरम्यान एक पाककृती एका हिंदू महिलेने टाकल्यानंतर त्या महिलेला सारी सामाजिक सभ्यता बाजूला ठेवून ज्या पद्धतीने ट्रोल करण्यात आले होते, तेव्हाच आपण किती असहिष्णू झालो *आहोटी* हे लक्षात आले होतेच. मात्र आता दिवसेंदिवस ही असहिष्णुततेची विषवल्ली साऱ्या देशाला आपल्या मगरमिठीत घेत आहे. एकप्रकारची आचार, विचार, आहार, विहारमधील संस्कृतीच्या नावाखालची कथित ठेकेदारी आज साऱ्या समाजासमोर सन्मानाने जगण्याचे आव्हान निर्माण करीत आहे. संविधानाने सामान्यांना दिलेले अधिकार नाकारणारी ही झुंडशाही कोण पोसत आहे हे वेगळ्याने सांगण्याची काहीच आवश्यकता नाही. मात्र आज एका पुरती, उद्या दुसऱ्यापुरती असणारी ही झुंडशाही हळूहळू प्रत्येकाचा गळा घोटणार आहे, त्यामुळे ती वेळीच छाटली पाहिजे, म्हणून प्रत्येकानेच आपण कोणत्या विचारांचे वाहक होत आहोत, कट्टरतावाद रुजविण्यात कोठेतरी आपलाही थोडा का होईना हातभार तर लागत नाही आहे ना? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, कारण कट्टरतावादाला आपला , परका कोणी नसतो, त्यांना केवळ कोणतेतरी लक्ष हवे असते, भक्ष्य हवे असते, ते कोणालाही गिळंकृत करायला मागेपुढे पाहात नाहीत. मांडलेकरांना आणि त्यांच्यासारख्या अभिनेत्यांना एव्हाना याची समज आली असेलच.