बीड : बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासमवेत खा.रजनी पाटील,शिवसेनेचे संपर्क प्रमुख पोतदार,आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
बीड लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी दिली आहे. सोमवारी दुपारी सोनवणे यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना केवळ पाचच व्यक्तींना सोबत येता येत असल्याने अनेक कार्यकर्त्यांना इच्छा असूनही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येता आले नाही. उमेदवारी अर्ज दाखल करताना बजरंग सोनवणे यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर, काँग्रेसच्या नेत्या.खा.रजनी पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख पोतदार, माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.उषा दराडे, माजी आ.पृथ्वीराज साठे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, बदामराव पंडित, सुनील धांडे, माजी आ.सिराज देशमुख,आदित्य पाटील, महेबुब शेख, पुजा मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते आदींसह महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकार्यांची उपस्थिती होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येणार होते. परंतु त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ते वेळेत येऊ शकले नाहीत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी भवन येथे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांना संबोधित केले.