Advertisement

संपादकीय अग्रलेख - घसरगुंडी रोखणार कशी? 

प्रजापत्र | Thursday, 18/04/2024
बातमी शेअर करा

   कोणत्याही देशाच्या चलनाला आंतरराष्ट्रीय बाजारात किती किंमत मिळते यावरून तो देश किती शक्तिशाली आहे हे ठरत असते. सध्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झालेला असताना आणि केंद्रातील सत्ताधारी देशाचा  'अमृत काळ' सुरु असल्याची भाषणे करीत असताना, देशाच्या चलनाची म्हणजे भारतीय रुपयाची घसरगुंडी सुरु आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आपल्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. १९४७-४८ मध्ये एका डॉलरची जिथे ३ रुपये ३१ पैसे मोजावे लागत होते, तिथे आता एका डॉलरसाठी आज ८३.६७ रुपये मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे मागच्या दहा वर्षात झालेली घसरण देखील मोठी आहे. १० वर्षात रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत तब्बल २१ रुपये आणि ३४ पैशांनी वाढलेली असेल तर अशा घसरगुंडीच्या वातावरणात आपण 'विश्वगुरू' कसे बनणार आहोत?
 

 

      मागच्या दोन दिवसात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया अचानक कोसळू लागला आहे. मागील वर्षी एका अमेरिकन डॉलरची किंमत ८१.९४ रुपये इतकी होती, ती काल परवा चक्क ८३.६७ रुपये इतक्या नीचांकी पातळीला पोहोचली. एकीकडे देशाला ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न अर्थसंकल्पाच्या माध्यमातून देशाला दाखविले जात आहे, देशाचा 'अमृतकाळ' सुरु असल्याच्या घोषणा केल्या जात आहेत, मागच्या दहा वर्षात देशाचा विकास किती गतीने झाला आहे आणि देश कसा धावत आहे हे आवर्जून सांगितले जात आहे.आणि त्याचवेळी देशाचे चलन मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक घसरत चालले आहे. कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची सशक्तता ही त्या देशाच्या चलनाला आंतरराष्ट्रीय बाजारात किती किंमत आहे यावर अवलंबून असते, मग असे असेल तर मागच्या १० वर्षांपासून रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण नेमके कशाचे धोरण आहे? ही चिन्हे कोणत्या प्रगतीची आहेत? किंवा हे नेमके कशाचे इशारे आहेत?

 

 

    भारताला स्वातंत्र्य मिळाले १९४७ला, तोपर्यंत आपल्या रुपयाची किंमत ब्रिटिश पौंडशी जोडली गेलेली होती, त्यावेळी अमेरिकन डॉलरची किंमत होती ३.३१ रुपये. १९७१ पर्यंत आपले ब्रिटिश  पौंडशी असलेले नाते टिकून होते, १९७१ मध्ये ती परिस्थिती बदलली, त्यावेळी एका डॉलरची किंमत ७.५ रुपये इतकी होती. त्यादृष्टीने आज तुलना करु गेले तर डॉलरची किंमत ११ पटीपेक्षा अधिक वाढली आहे. ७० च्या दशकातील युद्धजन्य परिस्थिती, आणीबाणी, राजकीय अस्थिरता असतानाही रुपयाची घसरण तुलनेने झाली नव्हती, मात्र नंतरच्या काळात देशाची वाढलेली देणी आणि इतर कारणांमुळे १९९१ ला तत्कालीन नरसिंहराव सरकारने रुपयाचे अवमूल्यन करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला, त्यावेळी डॉलरचा दर २४.५ रुपये इतका झाला होता. तत्कालीन केंद्र सरकारच्या त्या निर्णयावर टीका करण्यात त्यावेळी भाजप आघाडीवर होता. मात्र आताचे चित्र काय आहे? २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेवर आले त्यावेळी एका डॉलरसाठी ६२ रुपये आणि ३३ पैसे मोजावे लागत होते,यासाठी देखील भाजपच्या अर्थतज्ज्ञांनी पूर्वीच्या सरकारांवर टीका केली होती, मात्र केवळ दहा वर्षात डॉलरची वाढलेली किंमत आणि त्या तुलनेत घसरलेला रुपया काय सांगत आहे यावर भाजपवाले बोलणार आहेत का?
    कोणत्याही देशाच्या चलनाची किंमत ठरविणारे घटक आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी आणि देशांतर्गत जास्त असतात. महागाई हा या सर्वांमधला प्रमुख घटक असतो. ज्या देशात महागाईचा दर अधिक आहे, त्या ठिकाणी नव्याने गुंतवणूक करण्यास देखील उद्योग जगात पुढे येत नाही, परिणामी औद्योगिक उत्पादन कमी होते, आयात वाढली आणि निर्यात कमी झाली आणि व्यापाराचे संतुलन बिघडले तर त्याचा परिणाम त्या देशाच्या चलनाची किंमत घसरण्यात होतो. मागच्या दहा वर्षात देशात हेच सुरु आहे. इतर अस्मितेच्या गोष्टींमध्ये देशवासियांना अडकवून ठेवले जात आहे, पण वाढत्या महागाईवर सरकार काहीच बोलत नाही. १० वर्षांपूर्वी आज सत्तेत असलेल्या भाजपने 'बहोत हो गयी महंगाई की मार' म्हणून देशभरात रान उठविले होते, मात्र मागच्या दहा वर्षात महागाई सातत्याने वाढत आहे. २०२२ मध्ये तर देशातील महागाईचा दर सर्वाधिक ६.७० % इतका गेला होता, त्याला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर रिझर्व्ह बँकेला व्याज दरांमध्ये बदल करावे लागले. आताच्या घडीला महागाईचा दर ५.१०% इतका झालेला आहे. ज्यावेळी कोणत्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेला महागाई नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून व्याजदराचा आयुध म्हणून वापर करावा लागतो, त्यावेळी त्या देशाच्या चलनाची किंमत घसरत असते, त्याचा परिणाम आज आपण पाहात आहोत. जर आपण महागाईवर नियंत्रण मिळवू शकलो नाहीत आणि बेरोजगारीचा दर कमी करू शकलो नाहीत, तुटीचे अर्थसंकल्प थांबविले नाहीत आणि देशावरील कर्ज कमी झाले नाही तर रुपयाची ही घसरगुंडी अशीच सुरु राहणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज अमेरिकन डॉलर ,जपानी येन, स्विसचा फ्रॅंक यांच्याकडे सुरक्षित चलन म्हणून पहिले जाते, त्या क्रमवारीत आपण आजच्या घडीला पार १६ व्या  क्रमांकावर फेकलो गेलो आहोत, असे असेल तर आपण विश्वगुरू होण्याची स्वप्ने कशाच्या जोरावर पाहात आहोत?

 

Advertisement

Advertisement