इंदापूर-राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पडलेल्या फुटीनंतर पवार कुटूंबियातील मतभेद समोर आले आहेत. कधीही एकमेकांवर टीका न करणारे पवार कुटूंबातील व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून एकमेकांची उणीधुणी काढत परस्परांवर टीकेची झोड उठवित आहेत. राष्ट्रवादीच्या फुटीमध्ये पुढाकार घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार शाब्दिक युद्ध सुरूच आहे.
इंदापूर येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कडक शब्दात टीकास्त्र डागले. अजित पवार हे सत्तेशिवाय राहू शकत नसल्याची टीका करत अजितदादांचे 2019 पासूनच भाजपसोबत जाण्याचे प्लॅनिंग सुरू होते. पुणे जिल्ह्यात कोणताही आणि कुणीही हस्तक्षेप करायचा नाही, असा त्यांचा अलिखित नियमच होता, म्हणून आम्ही दुर्लक्ष करत होतो, असे रोहित पवार म्हणाले.