Advertisement

 चारवेळा अपयश जिद्द कायम ठेवत मिळवले यश !

प्रजापत्र | Wednesday, 17/04/2024
बातमी शेअर करा

शिरूर- तालुक्यातील पाडळी येथे प्राथमिक शिक्षण घेत एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होत बीडीओ म्हणून नोकरी मिळवली,नोकरी करत करत यूपीएससीचा अभ्यास सुरू ठेवला,चारवेळा अपयश आले तरीही खचून न जाता पाचव्यांदा यश मिळवत आपलं यश गाठणाऱ्या अभिजित पाखरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

 

 

अभिजीत पाखरे यांचे प्राथमिक शिक्षण पाडळी येथे झाले. माध्यमिक शिक्षण बीडमधील चंपावती विद्यालयात झाले. अभिजीत पाखरे यांचे आई वडील शिक्षक आहेत. खासगी शाळेत शिक्षक असलेले वडील ग्रामपंचायतचे सरपंचही आहेत. २०१९ मध्ये अभिजीत पाखरे यांनी एमपीएससीची परिक्षा दिली व पहिल्याच प्रयत्नात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नाशिकच्या येवला येथे प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून काम केल्यावर त्यांची पहिली नियुक्ती होणार होती. यावेळी त्यांनी आदिवासीबहुल मागास व अतिदुर्गम भागातून प्रशासकीय सेवेचा प्रारंभ करण्यासाठी वरिष्ठांना गडचिरोलीत पोस्टींग द्या अशी विनंती केली. त्यानुसार त्यांना गडचिरोलीच्या अहेरी या अत्यंत संवेदनशील ठिकाणी गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती देण्यात आली. शासकीय सेवेत कार्यरत असतांना त्यांनी युपीएससीसाठी तयारी सुरुच ठेवली. चार वेळा अपयश आल्यानंतरही सातत्याने आठ ते दहा तास अभ्यास करत पाचव्या प्रयत्नात यश मिळवले आहे. सध्या ते निवडणूक कर्तव्यावर असतांना ही गोड बातमी समजल्यानंतर कष्टाचे सार्थक झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

Advertisement

Advertisement