Advertisement

टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष बघितलं पाहिजे

प्रजापत्र | Saturday, 14/02/2026
बातमी शेअर करा

मुंबई : मालेगाव उपमहापौरांच्या कक्षात टिपू सुलतान यांचा फोटो भिंतीवर होता. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. या मुद्द्यावरुन नवा वाद निर्माण झाला होता. असं असताना आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान यांच्याबद्दल मोठं वक्तव्य करुन या वादाला आणखी नवं वळण आणल्याचं चित्र दिसत आहे. या मुद्द्यावरुन आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. "छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्यातील काम समकक्ष आहे", असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी टीका केली आहे.

        हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तिखट शब्दांत सपकाळ यांच्यावर निशाणा साधला आहे. "हर्षवर्धन यांनी या वक्तव्यावर माफी मागायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र आणि देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करत सर्वांना समान संधी, समान न्याय दिला. कोणत्याही धर्माबद्दल अत्याचार केला नाही. पण याउलट टिपू सुलतानने मात्र अनेक हिंदूंवर अत्याचार केल्याचे असंख्य दाखले इतिहासात आहेत, ते सपकाळांना माहिती नाही का? काँग्रेसचा मतांसाठी लाचारी करण्याचा जो प्रकार आहे त्यातूनच टिपू सुलतानचं उदात्तीकरण काँग्रेसकडून होतंय. काँग्रेस पक्षाने जाहीरपणे माफी मागितली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा अपमान आहे, ही वस्तुस्थिती आहे", अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली.

Advertisement

Advertisement