एकेकाळी , म्हणजे अगदी मागच्या निवडणुकीत ज्या अजित पवारांची राष्ट्रवादीच्या तिकीटवाटपात महत्वाची भूमिका असायची आणि काँग्रेस सोबत जागावाटप करताना जे अजित पवार एकेका जागेवर असून बसायचे , त्या अजित पवारांना महायुतीमध्ये अगदी चार हजारी सरदार करण्यात आले आहे. पाचवी नाशिकची जागा अजून तरी वादात आहे. त्या चारमधील २ जागांवर त्यांना इतर पक्षातून उमेदवार आयात करून त्यांना उमेदवारी द्यावी लागली आहे, त्यामुळे महायुतीसोबत जाऊन अजित पवारांनी नेमके साधले तरी काय ?
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, हे मान्य, पण म्हणून कोणाशीही संग करायला सुरुवात केली तर ते अंगलट येतेच. सध्या महाराष्ट्रात अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्या बाबतीत हेच चित्र आहे. एकनाथ शिंदे किमान लढल्याचे , ताणून धरल्याचे दाखवीत तरी आहेत, पण अजित पवारांनी भाजपसमोर सपशेल शरणागती घेतल्याची परिस्थिती महायुतीच्या जागावाटपाय पाहायला मिळत आहे.
अजित पवार हे अगदी काही महिन्यांपर्यंत एकसंघ राष्ट्रवादीचे मोठे नेते होते. त्यांनी भलेही अनेकदा रुसवे फुगवे केले असतील , पहाटे जाऊन शपथविधी केला असेल , पण राष्ट्रवादीमध्ये अजित पवारांची चालती होती. लोकसभेच्या ज्या काही २२-२३ जागा राष्ट्रवादी लढवायची , त्या बहुतांश जागांवर उमेदवार निश्चित करताना अजित पवारांच्या म्हणण्याला मोठी किंमत होती. ज्यावेळी काँग्रेस सोबत जागा वाटपाच्या बैठक व्हायच्या, त्यावेळी हेच अजित पवार एकेका जागेसाठी असून बसायचे , युती तोडण्याची भाषा करायचे, फतकल बोलून मोकळे व्हायचे किंवा मधूनच मोबाईल बंद करून 'अज्ञात ' ठिकाणी रवाना व्हायचे, पण त्यांना हवे ते पदरात पाडूनच घ्यायचे. त्यामुळे एक पावरबाज नेता अशी त्यांची प्रतिमा होती. भाजपला देखील भुरळ पडली होती, ती याच प्रतिमेची .
मात्र आता त्याच अजित पवारांचे भाजपसोबत जाऊन काय झाले आहे ? महायुतीच्या जागावाटपात आतापर्यंत अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला केवळ ४ जागा आल्या आहेत. आणखी फारच झाले आणि अजित पवारांनी ताणले , ताणले म्हणण्यापेक्षा आर्जवे केली, तर नाशिकची जागा राष्ट्रवादीला मिळू शकेल, म्हणजे अजित पवार गटाच्या जागांची महाराष्ट्रातील संख्या होईल ५ . जे अजित पवार राज्याचे गणित हातात घेऊन बसायचे , त्यांचा भाजपने अगदी पंच हजारी मनसबदार केला आहे. बरे या चार जागा किंवा मिळाल्याचं तर पाच जागांवर तरी सारे काही अजित पवारांच्या मनासारखे आहे का ? तर ते देखील नाही. एका जागेवर (बारामती ) पत्नी सुनेत्रा पवार , दुसऱ्या जागेवर (रायगड ) सुनील तटकरे सोडले तर धाराशिवच्या जागेवर भाच्चे सून असलेल्या अर्चना पाटलांना भाजपमधून आयात करावे लागले तर शिरूरच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेतून आढळराव पाटलांना राष्ट्रवादीत घेण्यात आले , हे म्हणजे दत्तक विधान केल्यासारखेच . उद्या नाशिकची जागा मिळाली तरी 'उमेदवारी छगन भुजबळांनाच द्यावी लागणार ' असे फर्मान म्हणे अगओदरच दिल्लीतून आलेले आहे. म्हणजे येथेही अजित पवारांना स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार फारसे राहिलेले नाहीत. राष्ट्रवादीचा किंवा शिवसेनेचा उमेदवार कोण असावा हे भाजप ठरवितो , पण भाजपचा उमेदवार कोण असावा हे सांगण्याचे अधिकार महायुतीमध्ये एकबानाथ शिंदे किंवा अजित पवारांना नाहीत , मग अजित पवारांच्या पदरात या महायुतीमधून नेमके काय पडले ?
मागच्या सहा महिन्यापासूनच्या सत्तेत अजित पवार भलेही उपमुख्यमंत्री, वित्त मंत्री असे असतील, पण त्यांच्या संचिका देवेंद्र फडणवीसांच्या नजरेतूनच जातात असे आजही सांगितले जाते, म्हणजे येथेही अजित पवारांच्या 'दादागिरीला ' मोडता घातला गेला आहेच. अजित पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना अनेक गोष्टी देता आल्याचं नाहीत. म्हणजे ना राजकीय सन्मान ना विकासाची उड्डाणे , भाजपच्या सोबत जाऊन अजित पवारांना देखील केवळ 'फरफट ' च नशिबी घेणे असेल तर सत्तेसोबत जाण्याचा अट्टाहास केलाच कशासाठी होता असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. या सर्व फेरफाटीमधून अजित पवारांच्या मागचे सिंचन घोटाळ्याचे शुक्लकाष्ठ काय ते मिटले आणि शिखर बँकेच्या चौकशीला ब्रेक लागला हेच काय ते फलित म्हणावे लागेल. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप अडचणीत असताना जर अजित पवार काय एकनाथ शिंदे काय, यांची अवस्था अशी असेल तर उद्या समजा लोकसभेत भाजपला भरपूर जागा मिळालाय , तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये अजित पवार, एकनाथ शिंदे यांचे भवितव्य काय असेल ? त्यांना किती जागांवर आपले दावे सांगता येतील आणि आपल्यातल्या किती लोकांचे समाधान करता येईल ? आणि स्वतःच्या त्या 'स्वाभिमानी ' वगैरे स्वभावाचे करायचे काय ? अजित पवारांना स्वतःला तरी हे प्रसाधन छळत असतीलच .