Advertisement

सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला दहा वर्ष कारावास

प्रजापत्र | Thursday, 07/01/2021
बातमी शेअर करा

 बीड -पत्नीला नांदायला पाठवित नसल्याने सासूला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीला अंबाजोगाई सत्र न्यायालयाच्या न्या.एम.बी.पट्टीवारी यांनी दहा वर्ष कारावास व १५ हजार दंडाची शिक्षा सुनावली. शिवशाला इंगळे यांची मुलगी सुनीता हिचा बोरखेड (ता.सेनगाव) येथील आरोपी तानाजी विठ्ठल भोसले याच्यासोबत विवाह झाला होता.विवाहानंतर तानाजी याला अमरावतीतील एका दरोडा प्रकरणात चार वर्ष कारावास भोगावा लागला.यानंतर दीड महिन्यासाठी पॅरोलवर त्याची सुटका झाल्यानंतर त्याने सुनीताच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.सुनीता या प्रकाराला वैतागून आपले माहेर दादाहारी वडगाव (ता.परळी) येथे आईकडे गेली.यानंतर आरोपीने ३ मे २०१५ रोजी रात्री ११ च्या सुमारास तिच्या घरी जात तिला शिवीगाळ करीत नांदण्यास परत ये म्हणून दमदाटी केली.मात्र सुनीताने आईने सांगितल्याशिवाय मी नांदायला येणार नसल्याचे सांगताच त्याने सुनीताची आई कुठे आहे अशी विचारणा करून तिला मारहाण केली.यावेळी सुनीताने आई काम करीत असलेल्या हॉटेलचा पत्ता दिल्यानंतर तानाजी भोसले व त्याचा एक सहकारी तिथे गेला.व शिवशाला इंगळे यांना माझ्या पत्नीला नांदायला का पाठवीत नाहीस असे म्हणून शिवीगाळ करीत तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी आरोपीला अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.त्यानुसार विविध कलमाखाली आरोपी तानाजीला दहा वर्ष कारावास व १५ हजार दंडाची शिक्षा न्या. एम.बी.पट्टीवारी यांनी सुनावली.ए.व्ही.कुलकर्णी यांनी सरकारी वकील म्हणून काम पहिले. 

 

यशराज हॉटेलमध्ये घडला थरार 

आरोपी तानाजी भोसलेने आपल्या सासू  शिवशाला इंगळे यांना जीवे मारण्याचा उद्धेशाने हॉटेल यशराजमध्ये येत त्यांच्या अंगावर पिस्तूलमधून गोळी झाडली.यावेळी शिवशाला यांनी ही गोळी हुकवल्याने त्या बालंबाल बचावल्या.यावेळी हॉटेलमधील उपस्थित असलेल्यांनी तानाजीला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्याच्या सह्कार्यासोबत फरार झाला.

Advertisement

Advertisement