बीड-शहरातील सर्वात वर्दळीचे ठिकाण असलेल्या बीडच्या बसस्थानकातील एका पारधी समाजातील महिलेला प्रवाशांनी पकडून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आज (दि.७) आणले होते.मात्र तक्रार देण्यासाठी कोणी पुढे येत नसल्याचे कारण सांगून शिवाजी नगर पोलिसांनी या चोरट्याला चक्क सोडून दिल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली.शिवाजी नगर पोलीस ठाण्यात सुरु असलेल्या या साऱ्या आलबेल कारभाराबाबत आता पोलीस अधिक्षक स्वतः लक्ष घालणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
शिवाजी नगर पोलीस ठाण्यात मारुती खेडकर यांनी पदभार घेतल्यानंतर ठाणे हद्दीतील भुरट्या चोऱ्या रोखणे त्यांच्यासमोर आव्हान होते.विशेष करून मागच्या काही कालावधीपासून बसस्थानकात चोरीचे प्रकार वाढलेले होते.यातील चोरट्यांना पोलिसांचे अभय असल्याची ओरड सातत्याने सुरु होती.त्यात काल एका महिला प्रवाशाची रक्कम प्रवासादरम्यान चोरीला गेली होती.आज पुन्हा ती प्रवाशी महिला गेवराईवरून बीडला येत असताना सदर चोरटी महिला त्याच बसमध्ये असल्याचे कळल्यानंतर बीड बसस्थानकात बस आल्यानंतर चौकीतील पोलिसांना याची माहिती देऊन त्या महिलेला शिवाजी नगर ठाण्यात आणण्यात आले.यावेळी तिची झाडाझडती घेतली असता तिच्याकडे फक्त ३०० रुपये असल्याचे कळते.यावेळी शिवाजी नगर पोलिसांनी तक्रारदार पुढे येत नसल्याचे कारण सांगून सदर महिलेला आज गुन्हा दाखल न करता सोडून दिल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
दखलपात्र गुन्ह्यातही का झटकले हात ?
फौजदारी प्रक्रिया संहिता अर्थात सीआरपीसीमध्ये अशी स्पष्ट तरतूद आहे की , दखलपात्र गुन्ह्यामध्ये कोणीही दखल घेऊन फिर्याद देऊ शकतो. या 'कोणीही'मध्ये पोलीस देखील येतात. अनेक प्रकरणात पोलीस स्वतःफिर्यादी होतात. मग या प्रकरणातच केवळ फिर्यादी नाही म्हणून पोलिसांनी संशयित आरोपीला सोडून दिल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
आरोपी तर सापडेनात पण...
बसस्थानकातील वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांनी ठोस उपाययोजना तर राबविलेली दिसून येत नाही.सातत्याने चोरीच्या घटना घडत असताना पोलीस आरोपींना एकीकडे अटक करत नाहीत पण जे आरोपी प्रवाशी पकडून देतात त्यांना ही फिर्याद पुढे नसल्याचे कारण सांगून सोडून देण्यात येत असतील तर सामान्यांना न्याय कोण देणार हा प्रश्न आहे.