Advertisement

संपादकीय अग्रलेख- दिशाभूल योग

प्रजापत्र | Thursday, 04/04/2024
बातमी शेअर करा

 आयुर्वेदाचे सारे ज्ञान आपल्यालाच आहे आणि आपण विकू तो आयुर्वेद याच भावनेतून रामदेव बाबा आणि त्यांचा पतंजली परिवार वागत आला आहे. दिशाभाऊला करणाऱ्या जाहिराती थांबविण्याचे आदेश खुद्द देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतरही पतंजली समूह दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध करण्याचा खोडसाळपणा करत आहे. यावर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने रामदेवबाबा यांना खडसावले आहे. त्यामुळे आता या दिशाभूल योगाला बळ तरी नेमके कोणाचे आहे ?
 

 

“सगळ्या सीमा ओलांडल्यानंतर आता तुम्ही माफी मागताय?” या शब्दात देशाचे सर्वोच्च न्यायालय रामदेव बाबा आणि पतंजली समूहाची खरडपट्टी काढत असेल आणि  “आम्हाला आश्चर्य वाटतंय की जेव्हा पतंजली बाजारात जाऊन कोविडवर अॅलोपथीमध्ये कोणताही उपचार नाही असा दावा करत होतं, तेव्हा केंद्र सरकार डोळे बंद करून गप्प बसलं होतं का ? ' असा सवाल उपस्थित करीत असेल तर आयुर्वेदाच्या नावाखाली देशभरात पतंजली समूहाकडून जी काही धूळफेक सुरु आहे त्याचे धागेदोरे किती खोलवर असतील याची कल्पनाच न केलेली बरी . मुळातच रामदेव बाबा आणि अआयुर्वेद यांचा मूळ संबंध आला कधी यावरून बरेच प्रश्न आहेत. आयुर्वेदाच्या प्रभावाला नाकारण्याचे काहीच कारण नाही, मात्र आम्ही म्हणजेच आयुर्वेद अशी भूमिका जेव्हा रामदेवबाबा किंवा पतंजलीसारखे गल्लाभरू घेत असतात, त्यावेळी ते काही चूर्ण, गोळ्या देत आहेत, त्याचा प्रभाव खरोखरच आहे का याचे मूल्यमापन करणे देखील आवश्यक असते. ही जबाबदारी अर्थातच सरकारची असते. सरकारच्या औषधांचे प्रमाणीकरण करणाऱ्या म्हणून ज्या काही संस्था आहेत, त्यांची असते. मात्र रामदेवबाबा आणि पतंजलीच्या बाबतीत या साऱ्याच संस्था अजूनही डोळे मिटून बसलेल्या आहेत.

 

 

पतंजली उद्योग समूहाच्या असाध्य आजारांवर औषध असल्याच्या जाहिराती हे कायद्याचे उल्लंघन आहे हे काळात असतानाही त्यांना अडविण्यासाठी केंद्रीय संस्था पुढे येत नाही याचा सरळ सरळ अर्थ केंद्र सरकारलाच हे सारे हवे आहे असाच असतो. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच पतंजलीच्या असल्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतरही पतंजलीने आपला हेका सोडला नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयालाच यात लक्ष घालावे लागले आहे. न्यायालयाने थेट र्मद्वेबाबा यांचेच कान उपटल्यानंतर आता त्यांनी माफी मागितली आहे, मात्र तोपर्यंत त्यांनी देशातील किती जनतेची दिशाभूल करून जनतेचे खिसे रिकामे करीत स्वतःच्या तुंब्या भरल्या हे देखील समोर यायला हवे.
मुळात देशात २०१४ मध्ये भाजपची जी सत्ता आली, त्यात रामदेवबाबा यांच्या रामलीला मैदानावरील योगापासून ते गावागावात केलेल्या योगाचे योगदान मोठे होते. जे काही प्राचीन त्याला लगेच हिंदुत्वाशी जोडायचे आणि पुन्हा हिंदुत्व म्हणजे जणू भाजपची मक्तेदारी , अशाच मानसिकतेतून पतंजली, त्यांचा आयुर्वेद आणि एकूणच योगसाधना म्हणजे भाजपाचेजे प्रचारकच बनले होते. त्याचा मोठा फायदा भाजपने घेतला . त्यामुळे साहजिकच २०१४ मध्ये केंद्रात भाजपची आलेली सत्ता पतंजलीसाठी सुगीचे दिवस आणणारी ठरली. एकदा सत्ताच आपली आहे असे लक्षात आल्यावर देशातील कायद्यांना विचारतो कोण या अविर्भावातच पतंजली आणि रामदेवबाबांच्या वर्तन मागच्या काही काळात राहिलेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर देखील त्यांचा मस्तवालपणा कमी होत नसेल तर त्यांना सत्तेचा किती मोठा पाठिंबा असेल हे वागले सांगण्याची आवश्यकता नाही. म्हणूनच रामदेवबाबा आणि पतंजलीने जो दिशाभूलयोग देशभर सुरु केला आहे, त्या पापाची जबादारी केंद्रीय सत्तेची म्हणजे भाजपची देखील आहेच. सामान्यांना लुटीच्या या योगातून भाजपदेखील मुक्त होऊ शकणार नाही. 

Advertisement

Advertisement