Advertisement

महाराष्ट्रातील जनता परिवर्तन करण्याच्या मन:स्थितीत- शरद पवार

प्रजापत्र | Tuesday, 30/04/2024
बातमी शेअर करा

 महाराष्ट्रात लोकांची मन:स्थिती परिवर्तन करण्याची आहे. दहा वर्षांत देशाचा कारभार करण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांची काम करण्याची पध्दत पाहून लोक अस्वस्थ आहेत. देशाच्या संविधानाला कोणीही धक्का लावू शकत नाही, हे दाखवून देण्याची ताकद सर्वसामान्यांमध्ये आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केले. उरुळी कांचन येथे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते. या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्ह्याध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड, काँग्रेसचे देविदास भन्साळी आदी उपस्थित होते.

 

 

शरद पवार म्हणाले की, या सरकारचे शेतीवरचे लक्ष कमी होत आहे. या देशाचा कारभार हुकूमशाही पध्दतीने सुरू आहे. मोदींचा संसदीय लोकशाही पद्धतीवर विश्वास नाही. या देशाची घटना बदलण्याचे काम त्यांना करायचे आहे आणि म्हणूनच 400 पारचा नारा ते देतायेत. तुमच्या सांगण्यावरून भूमिका बदलली नाही, स्वाभिमान गहाण टाकला नाही; म्हणून निधी अडविला असला, तरी शिरूरची जनता तुम्हाला उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही, अशा कडक शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या जाहीर सभेत थेट सुनावले. देशात मत मागायच्या पद्धती बदलल्या आहेत. काम सांगून मत मागायचे दिवस गेलेत; कारण भाजपला एक काम सांगता येत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

Advertisement

Advertisement