विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याच्या विषयावर आपली तलवार म्यान केल्यानंतर आता त्यांच्या कार्यकर्त्यांचा संताप सोशलमिडियाच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. ‘माझा नेता पलटूराम’ या शब्दात कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेल्या भावना सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या आहेत. मात्र पलटूराम म्हणावे असे विजय शिवतारे काही एकटे नाहीत मागच्या काही काळात सार्या देशाचेच राजकारण गचाळ झाले आहे आणि महाराष्ट्रात तर जणू पलटूरामांची फौजच निर्माण झालेली आहे. अशावेळी कोणाला झाकावे आणि कोणाला काढावे? ‘उडीदामाजी काळेगोरे, काय निवडावे निवडणारे?’ अशी अवस्था सध्याच्या राज्याच्या राजकारणाची झालेली आहे.
देशाच्या राजकारणात काही दशकांपूर्वी आयाराम गयाराम ही संकल्पना अस्तित्वात आली होती. कपडे बदलावे इतक्या झटपट पक्ष बदलण्याच्या मानसिकतेतून ही संकल्पना पुढे आली आणि मग मागची काही दशके सातत्याने या वाकप्रचाराचा वापर सातत्याने होत राहिला मात्र आता आयाराम गयाराम हा शब्दप्रयोग मागे पडावा अशी परिस्थिती राज्याच्या राजकारणात आहे किंबहूना देशाच्या राजकारणात आहे. मागच्या काही काळात देशाच्या राजकारणात ‘पलटूराम’ हा एक नवीन शब्द मिळालेला आहे. सुरूवातीच्या काळात बिहारमध्ये नितीशकुमारांच्या संदर्भाने हा शब्द भाजपने वापरला होता. अमित शहा यांनी नितीशकुमारांना पलटूराम म्हटले होते. मात्र नंतरच्या काळात त्याच पलटूरामांना भाजपने कशा मिठ्या मारल्या आहेत हे सार्या देशाने अनुभवले आहेच. आता महाराष्ट्रात विजय शिवतारेेंच्या संदर्भाने त्यांच्या कार्यकर्त्याने ‘माझा नेता पलटूराम निघाला’ अशा आशयाचे एक पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल केले. ज्याला सर्वच राजकीय कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.
राजकारणातल्या सामान्य कार्यकर्त्याला आपल्या नेत्याबद्दल एक प्रकारची आस्था आणि अस्मिता असते मात्र कार्यकर्त्यांना आपल्याबद्दल काय वाटते किंवा आपल्या एखाद्या कृतीचा कार्यकर्त्यांवर काय परिणाम होईल याचा विचार करणारे नेतृत्व आता अपवादातच राहिले आहेत. नेत्यांना आपल्या राजकीय भुमिका एका क्षणात बदलता येतात. त्याबद्दल कोणी काही टिका केली तर पुन्हा मतदार संघाच्या विकासासाठी अशी भुमिका घ्यावी लागली हे ठरलेले उत्तर असते. त्यापुढे जावून आता एखाद्या विधानसभा मतदार संघातील सोडा अगदी एखादा नगरसेवक सुद्धा देशाला प्रगतीपथावर नेहण्यासाठी आपण ही भुमिका कशी घेत आहोत हे सांगू लागला आहे. पुढार्यांनी निर्लज्जपणे कसल्याही पलट्या मारायच्या ही आता राज्याच्या आणि देशाच्या राजकारणाची ओळख बनत चालली आहे. पुर्वी डोंबार्याच्या खेळात कोलांटउडी मारणार्या कलाकाराच्या कलेला दाद म्हणून टाळ्या वाजविल्या जायच्या आता तर कोलांटऊडी या प्रकाराचीच किळस यावी असे सारे राजकीय वातावरण देशात आणि प्रगत व पुरोगामी म्हणविणार्या महाराष्ट्रात देखील अनुभवायला मिळत आहे.
आजच्या राजकीय परिघातले चेहरे बघितले तर काही अपवाद वगळता पक्ष फोडून किंवा राजकीय भुमिका बदलून सत्तेसोबत राहण्यात धन्यता मानणारे चेहरेच सर्वत्र दिसतात. त्यामुळे एकट्या विजय शिवतारेंना पलटूराम म्हणण्यात अर्थ नाही.
शिवतारेंच्या कार्यकर्त्यांनी माझा नेता पलटूरामचे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर ज्या पद्धतीने राजकीय वर्तूळात सामान्य कार्यकर्त्यांनी ते पत्र उचलून धरले. ते पाहता शिवतारेंमध्ये प्रत्येकाला आपल्या नेत्याचा चेहरा पहायला मिळत आहे हेच राजकीय वास्तव महाराष्ट्राच्या गावागावात आहे. राजकारणातील तात्पुरत्या फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी भुमिकेची पलटी मारताना नेत्यांना भलेही काही वाटत नसेल पण ही पलटूराम संस्कृती राजकारणात फार काळ टिकत नसते, मग ते नितीशकुमार असोत, विजय शिवतारे असोत किंवा आणखी कोणी?