Advertisement

संपादकीय अग्रलेख- सर्वांचे समाधान होणार कसे ?

प्रजापत्र | Saturday, 30/03/2024
बातमी शेअर करा

भारतीय राजकारणात 'एक अनार , सौ बिमार' ची परिस्थिती तशी नेहमीचीच . एका जागेसाठी प्रत्येक पक्षात अनेक जण इच्छुक असतातच , त्यातील कोणाला तरी एकालाच संधी मिळणार हे तर स्पष्टच असते. पण आतातर महाराष्ट्रात एकाच जागेसाठी अनेक पक्ष इकचुक आणि प्रत्येकाला आपल्याकडेच 'इलेक्टॉल मेरिट ' असल्याचा प्रचंड विश्वास , त्यामुळे महायुती काय किंवा महाविकास आघाडी काय, यांच्यातील जागावाटपाची रस्सीखेच अजूनही संपलेली नाही. त्यातच भाजपला स्वतःच्या बळावरच जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत, त्यामुळे मित्रपक्षांचा कासरा फारसा सैल सोडायला हा पक्ष तयार नाही. त्यामुळे आजच्या घडीला तरी सर्वांचे समाधान करायचे कसे हा प्रश्नच आहे .
 

 

संत ज्ञानेश्वरांनी साऱ्या जगासाठी 'जो जे वांछील तो ते लाहो ' असे पसायदान मागितले होते. त्यांचे हे पसायदान त्यांनी ज्यांच्याकडे मागितले, त्यांनी त्याला 'तथास्तु ' म्हणताना कदाचित यातून राजकारण अपवाद केले असेल . किमान महाराष्ट्रात तरी सध्याची परिस्थिती 'जो जे वांछील तो ते लाहो ' ची राहिलेली नाही . अगदी देशातील सर्वात शक्तिमान म्हणवल्या गेलेल्या भाजपसाठी देखील नाही , महायुतीसाठीही नाही आणि महाविकास आघाडीसाठी  देखील नाही.
महायुतीमध्ये भाजपने राष्ट्रवादी आणि शिवसेना फोडून वेगळे झालेले पक्ष सोयाबीत घेतलेले आहेत. यातील अजित पवार गटाची लढत तर मागच्या निवडणुकीत भाजपसोबतच झाली होती. काही ठिकाणी शिवसेना देखील विरोधात होती. त्यामुळे आताच्या अनेक जागांवर अर्थातच शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप सर्वांचेच वर्चस्व आहे. त्यामुळे आता आपणच ती जागा जिंकू शकतो असा विश्वास प्रत्येकाला आहे. त्यामुळेच भाजपने इतर अनेक ठिकाणच्या जागा जाहीर  केल्या असल्या तरी महायुतीचे संपूर्ण जागावाटप अद्यापही या पक्षाला जाहीर करता आलेले नाही. इतर कोणत्याही राजय्त भाजपवर अशी वेळ आलेली नाही. एकनाथ शिंदे या माणसाला आपण सहज गुंडाळू शकतो असे सुरुवातीला भाजपला वाटले होते , पण एकनाथ शिंदे वाटतात तितके सोपे नाहीत हे एव्हाना सर्वांच्याच लक्षात आले आहे. अजित पवार तर पहिल्यापासूनच एककल्ली . त्यामुळे त्यांनी रायगडचा उमेदवाराचं जाहीर करून टाकला . भाजपवाले तेथे हात चोळत बसले आहेत. तिकडे अमरावतीत नवनीत राणा आणि बच्चू कडू यांच्यातील संघर्ष थांबायचे नाव घेत नाही. छत्रपती संभाजीनगरची जागा अजूनही वादातच आहे. अशा अनेक ठिकाणची उदाहरणे देता येतील . त्यामुळे उद्या जागा वाटप जाहीर झाले तरी ठिकठिकाणच्या नाराजीचे काय ? बरे केवळ आमची जागा म्हणून एखादी जागा पदरात पडायची आणि त्यासाठी दुसऱ्या पक्षातून उमेदवार 'दत्तक ' आणायचा यातून काय सह्दयाचे आहे. म्हणजे शिवाजीराव आढळरावांना आपल्या पक्षात घेऊन उमेदवारी द्यायची आणि केवळ आअप्लयला जागा मिळाली याचे समाधान मानायचे, धाराशिवच्या जागेचे देखील तसेच. जागा आमची आहे म्हणून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडे ठेवली आहे, पण येथून लढवणार कोणाला ? राणा जगजितसिंह निवडणूक लढवायला तयार नाहीत, प्रवीण परदेशींना निवडणूक लढवायची आहे , पण त्यांना 'कमळ ' हेच चिन्ह पाहिजे , मग यातून मार्ग काढायचा कसा ?  कल्याणचा तिढा सोडवायचा कसा हाही प्रश्न आहेच.
जसे महायुतीचे , तसेच महाविकास आघाडीचे देखील आहे.

 

 

या आघाडीला एकीकडे भाजपला रोखायचे आहे, पण त्यासाठी आपला इगो मात्र बाजूला ठेवायचा नाही. उबाठा गटाची शिरजोरी कायम आहेच. बाळासाहेब असताना त्यांनी आपलेच चालवायचे आणि भाजपच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी करायची हे सारे उद्धव ठाकरेंनी अनुभवले आहे, त्यामुळे ते आताही तसे वागू इच्छितात . पण एकतर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेब नाहीत , आणि काँग्रेसचे राजकारणच वेगळे आहे याची जाणीव त्यांना होताना दिसत नाही. काँग्रेसनेही तसेच, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंना तर आघाडीला सुरुंग लावायलाच ठेवले आहे का काय असे वाटावे असे चित्र आज आहे. सांगलीच्या जागेवरून काँग्रेसने जो थयथयाट केला, त्यावरून महाविकास आघाडीमध्ये देखील सारे काही आलबेल नाही. शरद पवारांनी देखील आणखी बरेच पट्टे झाकूनच ठेवले आहेत. वंचितला सोबत घ्यायचे का नाही यावरून देखील या आघाडीत एकमत होताना दिसत नाही.
राज्यातील पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत देखील संपली आहे, तरीही दोन्ही प्रमुख आघाड्यांचे जागावाटपच अंतिम झालेले नाही अशी परिस्थिती यापूर्वी कधी पाहायला मिळाल्याचे आठवत नाही. त्यामुळे जिथे जागावाटपावरूनच इतकी रस्सीखेच आहे, तिथे प्रचाराच्या काळात सर्वांना एकत्र ठेवायचे कसे असा प्रश्न असणारच आहे. महायुती काय किंवा महाविकास आघाडी काय ,ज्यांच्या विरोधात कायम लढत आलो, आता त्यांचेच झेंडे उचलायचे कसे, असा प्रश्न सर्वच कार्यकर्त्यांना पडणार आहे. त्यामुळे राजी नाराजीच्या नाटकांचे आणखी किती अंक राज्याला पाहायला मिळतात हे आजतरी सांगणे अवघड आहे. 

Advertisement

Advertisement