प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची सध्या तळ्यात-मळ्यात अशी स्थिती आहे. हा पक्ष कधी महाविकास आघाडीत सहभागी झाला आहे असं सांगितलं जातं तर कधी आंबेडकरांचे मविआबरोबरचे वाद समोर येतात आणि प्रकाश आंबेडकर सांगतात की, आमचा पक्ष अद्याप मविआचा सदस्य नाही. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यास इच्छुक आहे. तसेच महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष त्यास अनुकूल आहेत. मविआतला प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाशी वंचितची आधीपासूनच युती आहे. तरीदेखील वंचितच्या महाविकास आघाडीतल्या सहभागाबाबत संभ्रम कायम आहे.
दरम्यान, प्रकाश आंबेडकर आणि मविआतील पक्षांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. वंचितचा कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी (शरद पवार गट) तर कधी ठाकरे गटातील खासदार संजय राऊतांबरोबर संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, वंचितने आता शिवसेनेच्या ठाकरे गटाला, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला डावलून थेट आणि केवळ काँग्रेसची चर्चा सुरू केली आहे. आंबेडकरांनी काँग्रेस पक्षप्रमुखांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मी महाराष्ट्रातील ७ जागांवर वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळणाऱ्या कोणत्याही ७ मतदारसंघांची नावं त्यांनी आम्हाला द्यावी. त्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पूर्ण पाठिंबा देईल. आम्ही तिथल्या काँग्रेस उमेदवारांना त्यांच्या मतदारसंघात, मैदानी आणि धोरणात्मक पाठिंबा देऊ.” दरम्यान, आंबेडकर यांनी वंचित मविआबरोबर राहण्याची शक्यता नाही, असं वक्तव्य केलं आहे. यावर मविआकडून प्रतिक्रिया आली आहे.