बीड दि. १६ (प्रतिनिधी ) : एकीकडे लोकसभा निवडणुकीचा रंग चढण्यास सुरुवात झालेली असतानाच मागच्या तीन चार दिवसात बीड जिल्ह्यात चोऱ्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. बीड शहरासह जिल्ह्यात वाहन चोरी, घरफोडी आणि अगदी वाहनातून पेट्रोल चोरण्याचा घटना देखील वाढल्या आहेत . मात्र चोरांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाही. ज्यांनी अशा चोऱ्या घरफोड्या रोखण्यासाठी पाऊले उचलायची तेच स्वतःच्या खुर्च्या वाचविण्यासाठी फिल्डिंग लावण्यात मग्न आहेत, त्यामुळे जिल्हा मात्र चोरांना आंदण दिल्याचे चित्र आहे.
मागच्या काही दिवसात बीड जिल्ह्यात चोरी, घरफोडीच्या घटना वाढल्या आहेत. असाही मोठ्या दरोड्यांचा यशस्वी तपास लावणाऱ्या एलसीबीला किंवा स्थानिक पोलिसांना छोट्या चोऱ्या उघडकीत आणण्यात यश आल्याचा फारसा लौकिक नाही. त्यामुळे भुरट्या चोरांना जिल्ह्यात अभय असल्याचेच वातावरण आहे. त्यातूनच मागच्या आठवडाभरातच जिल्ह्यात चोरी, वाहन चोरीच्या घटना वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहन चोरीच्या तक्रारीचा दाखल होत नाहीत. बीड शहरात तर वाहनांमधून पिट्रोल चोरण्याचं प्रकार मागच्या आठवडाभरात अनेक ठिकाणी घडले आहेत. मात्र यातील कशाचीच उकल पोलिसांकडून होताना दिसत नाही. अगदी आष्टी मधील जोगेश्वरी देवीच्या मंदिरात झालेल्या चोरीचा तपास देखील अद्याप लागलेला नाही.
मागच्या चार पाच दिवसात बीड जिल्हा पोलीस दलात बदल्यांचीच चर्चा जास्त होती. त्यामुळे जबाबदार अधिकारी देखील खुर्चिव वाचविण्यात किंवा कोणाची तरी खुर्ची सुरक्षित करण्यात , कोणाची तरी खुर्ची हलविण्यात व्यस्त होते असेही खाजगीत बोलले जाते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित झोपायचे ते कोणाच्या भरवशावर असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
--------------------------------------------