’आम्ही ऐन निवडणुकीत घड्याळ चिन्ह गोठवण्याऐवजी तुम्ही आताच दुसरे चिन्ह निवडा ’ या शब्दात न्यायालय आपल्याला समाज देईल असे अजित पवार गटाला स्वप्नातही वाटले नसते. ’महाशक्ती’चा आशीर्वाद असल्याने निवडणूक आयोगातून हवा तसा निवड लावून घेतला म्हणजे सारे काही जिंकल्याच्या अविर्भावात असलेल्या अजित पवार गटाला आता ’घड्याळाचे काटे उलटे देखील फिरतात ’ याचा अनुभव यायला सुरुवात होईल.
’महाशक्ती ’ अर्थात भाजप सोबत असेल तर सत्तेच्या छायेखाली काहीही होऊ शकते हे आव्हान देशभरात स्थापित सत्य झालेले आहे. वेगवेगळ्या राज्यातील पक्ष फोडणे , सरकारे खाली खेचणे आणि भाजपची सत्ता वाढविणे हेच उद्योग भाजप करीत आलेला आहे. अजित पवारांसारख्या नेता त्यांच्या गळाला न लागता तरच नवल. भाजपने त्यांना अमिश दाखविले आणि अजित पवार त्याला भुलले . आता महाराष्ट्रात शरद पवारांच्या राजकारणाला सुरुंग लावता येतो असे लक्षात आल्यानंतर साहजिकच अजित पवारांना रिझविण्यासाठी त्यांच्या पदरात काही दान टाकणे आवश्यक होतेच. त्यासाठी मग केंद्राचा होयबा झालेला निवडणूक आयोग होताच. आयोगाने राष्ट्रवादीची मालकीचं अजित पवारांना बहाल करून टाकली. साहजिकच घड्याळ चिन्ह देखील अजित पवारांना मिळाले. त्यांच्या गटाने लगेच ’ घड्याळ तीच, वेळ नवी ’ असा नारा देखील दिला. मात्र राजकारणात सदा सर्वकाळ कोणतीच वेळ कायम टिकत नसते याची जाणीव आता अजित पवारांना व्हायला हरकत नाही.
खरेतर कोण शरद पवार? त्यांनी पक्ष हुकूमशाहीने चालविला, त्यांचे वय झाले असे काहीबाही आरोप करून आणि आपणच राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत असा दावा करून अजित पवारांनी एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळवल्यानंतर पुन्हा पक्षाच्या बॅनरवर शरद पवार यांचा फोटो लावण्याची काहीच आवश्यकता नव्हती. मात्र अजित पवारांना देखील दोन्ही डगरींवर उभे राहायची सवय लागली का काय असे वाटावे अशी परिस्थिती अशा बॅनरमुळे निर्माण झाली. एकतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस काय किंवा एकनाथ शिंदेंनी शिवसेना काय, निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने मिळविली म्हणून जनतेचा आशीर्वाद त्यांच्यासोबत राहील हा देखील राजकीय भ्रमच , पण तो भ्रम सोडायला हे दोन्ही नेते अजूनही तयार नाहीत.
मात्र त्यानंतर जे काही सर्व्हेक्षण समोर आले, त्यात मात्र आजही राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे असेच बहुसंख्य लोकांना वाटत असल्याचेच समोर आले आहे. कोणत्याच सर्व्हेत यापेक्षा वेगळे चित्र दिसत नसल्याची परिस्थिती आहे. आणि कदाचित त्यामुळेच भाजपने देखील आपल्या या नव्या मित्रांना जागावाटपात ’जागा दाखविण्यात ’ कसर सोडलेली नाही. अद्याप अधिकृत जागा वाटप जाहीर व्हायचे आहे, मात्र यात दोन्ही पक्षांच्या वाट्याला फार काही ’सन्मान ’ येईल असे चित्र बिलकुल नाही. एकनाथ शिंदेंना तरी किमान दोन आकडी जागा मिळण्याची शक्यता आहे, कारण ते आलेच होते मुळात 13 खासदार सोबत घेऊन , पण अजित पवारांचे काय ? त्यांना भाजपकडून जी काही वागणूक मिळत आहे, त्यामुळे त्यांचे समर्थक देखील हवालदिल आहेत. म्हणूनच आता अनेकांची घरवापसीची तयारी सुरु आहे. आणि अशावेळी सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला धक्का दिला आहे. ’तुम्हाला निवडणुकीतच शरद पवार कसे हवे असतात ? तुम्ही दोघेही आता वेगवेगळे आहेत आणि आपली वेगळी ओळख घेऊन जनतेत का जात नाही ? ’ असा सर्वोच्च न्यायालयाने विचारलेला सवाल खरेतर अजित पवारांची चिंता वाढविणारा आहे. शरद पवारांचे एक ठीक आहे, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुका लढविल्या आहेतच. पण अजित पवारांचे काय ? मुळात स्वतःच्या नेतृत्वात ते पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आणि त्यातही आता घड्याळाच्या काट्यांचा प्रवासच उलटा होणार असेल तर ? राजकारणात काहीही होऊ शकते हेच शेवटी अंतिम सत्य आहे असेच म्हणावे लागेल.