Advertisement

बीड लोकसभेत शरद पवारांकडून येणार तगडा उमेदवार

प्रजापत्र | Thursday, 14/03/2024
बातमी शेअर करा

बीड- बीड लोकसभा मतदारसंघात भाजपाने माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडूनही या मतदारसंघात तगडा उमेदवार दिला जाणार असल्याचे संकेत आहेत. यापूर्वी लोकसभा निवडणूक लढविलेले बजरंग सोनवणे यांनी शुक्रवारी आपल्या कार्यकर्त्यांची बैठक बजरंग सोनवणे मित्र मंडळ या नावाने बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांच्या नजरा असून त्यानंतर शरद पवारांचा उमेदवार जाहीर होणार आहे.

 

बीड लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून अनेकजणांनी उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र शरद पवार एका तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत असे सांगितले होते. त्यातच मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात असलेले माजी जिल्हाध्यक्ष तथा येडेश्‍वरी उद्योग समुहाचे प्रमुख बजरंग सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील अश्या चर्चा सुरू झाल्या होत्या.यावर बजरंग सोनवणे यांच्याकडून मौन पाळले गेले होते. या पार्श्‍वभूमीवर आता बजरंग सोनवणे मित्र मंडळाची तातडीची बैठक शुक्रवारी बोलावण्यात आली आहे. विशेष म्हणजे बैठकीसाठी जे बॅनर तयार करण्यात आले त्यावर बजरंग सोनवणे वगळता इतर कोणाचाही फोटो नाही.त्यामुळे या बैठकीत बजरंग सोनवणे वेगळा राजकीय निर्णय घेतील असेच संकेत मिळत आहेत. त्यामुळे उद्या कदाचित राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार म्हणून बजरंग सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात दिसणार का? याचीच उत्सूकता वाढली आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढविली होती त्यावेळी त्यांचा निसटता पराभव झाला होता. त्यामुळ आता जर त्यांची उमेदवारी आली तर बीड मतदारसंघातील लढत चुरशीची होईल.

 

Advertisement

Advertisement