बीड- गाडीचा धक्का लागल्याने स्वराज्य संघटनेच्या जिल्हाध्यक्षास काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर जमावाने जिल्हाध्यक्षाच्या घरावर दगडफेक करून त्यांच्या व इतरांच्या गाड्यांची तोडफोड केली. या घटनेने बालेपीर परिसरात रात्री तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हातात तलवार, दांडे इतर घातक शस्त्र घेवून दहशत निर्माण केल्याने नागरीकात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी शिवाजी नगर पोलिस ठाण्यात 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरज जायभाये यांच्या गाडीचा रितेश उमेश जाधव यांना धक्का लागला होता. यातून वाद निर्माण झाला. या वादातून जायभाये यांना रितेश जाधव, गणेश गिरी, रोहन जाधव, वैभव जाधव यांच्यासह आदी लोकांनी मारहाण करत त्यांच्या घरावर दगडफेक केली. तसेच त्यांची गाडी (एम.एच.23 बी.सी 4223) या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या त्याच बरोबर बुलेट, प्लसर, सुझूकी, अॅक्सेस स्कुटी यासह इतर गाड्यांचे नुकसान करण्यात आले. जमावाने हातात घातक शस्त्र घेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे बालेपीर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला झाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते. रात्री उशीरा शिवाजी नगर पोलिस ठाण्यात रितेश जाधव, गणेश गिरी, रोहन जाधव, वैभव जाधव यांच्यासह 40 ते 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.