कडा- अहमदनगर येथील एक २१ वर्षीय सिव्हिल इंजिनिअर कडा येथे गाईंची चोरी करताना दोन साथीदारांसह रंगेहाथ पकडला गेला. शिवराज सुनिल पवार, सोमनाथ संतोष कर्डिले, रोहित गोरख रोखले अशी आरोपींची नावे आहेत.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील २१ वर्षीय तरुण शिवराज सुनिल पवार हा सिव्हिल इंजिनिअर आहे. मागील तीन वर्षापासून तो आईसह अहमदनगर येथे राहत आहे. सोमवारी रात्री कडा येथील बाळू धोंडीबा ओव्हाळ यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन गाई छोट्या टेम्पोमध्ये टाकून (एम.एच.१६,ए.वाय.८९९२ ) चोरीस गेल्या. चोरीचा सुगावा लागताच ग्रामस्थ आणि पोलिसांनी पाठलाग करत बीड-अहमदनगर राज्य महामार्गावरील उंदरखेल येथे टेम्पो अडविला. यावेळी टेम्पोतील गाईंची सुटका करण्यात आली. तर चोरटे शिवराज सुनिल पवार, सोमनाथ संतोष कर्डिले (१९ रा.डोंगरगण रोड कडा ता.आष्टी ) आणि रोहित गोरख रोखले (२१ रा.नालेगांव अहमदनगर) यांना पोलिसांनी अटक केली. हे तिघे चोरीच्या गाईंची नंतर बाजारात विक्री करत असल्याची माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी बाळू धोंडीबा ओव्हाळ याच्या फिर्यादीवरून मंगळवारी पहाटे आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस याच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे,पोलीस नाईक विकास जाधव, पोलीस अंमलदार मजरूद्दीन सय्यद, दिपक भोजे,सचिन गायकवाड, वाहन चालक प्रदिप घोडके यांनी केली. पुढील तपास पोलीस नाईक विकास जाधव करीत आहेत.