Advertisement

संतोष साबळेंच्या बदलीसाठी वंचितचे आयजींच्या कार्यालयाबाहेर धरणे

प्रजापत्र | Monday, 11/03/2024
बातमी शेअर करा

बीड दि.११ (प्रतिनिधी)-निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषाला हरताळ फासून बीड जिल्ह्यात पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर आपल्या लाखमोलाच्या माणसाला वाचविण्यासाठी नियमांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.सोमवारी (दि.११) छत्रपती संभाजी नगर येथील आयजींच्या कार्यालयासमोर जमावबंदीच्या आदेशाचे पालन करत वंचितचे जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.यावेळी खाडे यांनी शुक्रवारपर्यंत साबळे यांची बदली न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. बीड जिल्ह्यात आपल्या मर्जीतील पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांपासून संरक्षण देण्यासाठी लाखोंची उलाढाल करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी निवडणूक आयोगाच्या बदलीसाठी जे निकष दिले आहेत,त्याला धाब्यावर बसवत आपल्या सोयीने अर्थ काढून अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आहेत.त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पारदर्शी कारभाराबाबतच प्रश्न उपस्थितीत होऊ लागला असून याला वाचा फोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने आता पुढाकार घेतला आहे.स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना जिल्ह्यात दाखल होऊन तीन वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाल्यानंतरही त्यांची अद्याप बदली झालेली नाही.सुरुवातीला निवडणूक आयोगाने मागविलेल्या माहितीमध्ये त्यांचे नाव देण्यात आले होते.मात्र नंतरच्या काळात पैशांची देवाणघेवाण झाल्यानंतर त्यांना बदलीपासून सरंक्षण मिळाले असल्याच्या चर्चा आहेत.त्यामुळे ज्या अधिकाऱ्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी या मागणीसाठी आज (दि.११) वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगरमधील आयजींच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.याप्रसंगी जिल्हाध्यक्ष उद्धव खाडे,युवक जिल्हाध्यक्ष अनुरथ वीर,जिल्हा सहसचिव दगडू गायकवाड,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ.गणेश खेमाडे यांची उपस्थिती होती.

 

यावेळी कायद्याचे केले पालन पण...

राज्यात जमावबंदीचे आदेश असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जावी यासाठी आम्ही केवळ चार जण सोमवारी धरणे आंदोलनाला बसलो.आमच्या मागण्या लोकशाही पद्धतीने मांडल्या.पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर सरळसरळ निवडणूक आयोगाच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत.आपली लाखमोलाची माणसं वाचविण्यासाठी ते ज्या पद्धतीने वर्तवणूक करत आहेत ते लोकशाहीसाठी गंभीर आहे.आम्ही आज कायद्याचे पालन करत चार लोकांच्या उपस्थितीत धरणे दिली.मात्र शुक्रवारी (दि.१५) वंचित बहुजन आघाडी आयजींच्या कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने आंदोलनाला बसेल त्यावेळी कायदा व सुवस्थेची जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असा इशाराही जिल्हाप्रमुख उद्धव खाडे यांनी निवेदनातून दिला आहे.

Advertisement

Advertisement