Advertisement

प्रजापत्र अग्रलेख- अमित शहा कांही शरद पवार नाहीत

प्रजापत्र | Saturday, 09/03/2024
बातमी शेअर करा

     हो, नाही करता करता, अखेर निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या 'राष्ट्रवादी'चे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार जागावाटपाच्या चर्चेसाठी दिल्लीला अमित शहांच्या दरबारात हजेरी लावते झाले. अजित पवारांनी भलेही निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ताबा मिळविला असेल, पण म्हणून भाजपसाठी ते 'राष्ट्रीय' वगैरे नेते होऊ शकत नाहीत. लोकसभेसाठी एक आकडी जागांचा प्रस्ताव देऊन भाजपच्या दरबारात त्यांची किंमत चार पाच हजारी मनसबदारापेक्षा वेगळी नसल्याचे भाजपने दाखवून दिले आहे. अजित पवारांचे नखरे सहन करायला अमित शहा म्हणजे काही शरद पवार नाहीत याची जाणीव एव्हाना अजित पवारांसह त्यांच्या सोबत असलेल्या सरदारांना देखील झाली असेलच. 

      महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपाचे त्रांगडे सुटायला तयार नाही. अर्थात सुटायला तयार नाही म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना पचायला तयार नाही. एवढा मोठा राष्ट्रवादी पक्ष, पण आपल्या पक्षाला इतक्या वर्षांत मुख्यमंत्रीपद मिळविता आले नाही आणि असलेच काही प्रश्न उपस्थित करुन अजित पवारांनी आपले काका शरद पवार यांना आव्हान दिले होते. खरेतर हे बोलतानाही महाराष्ट्र राष्ट्रवादीत अजित पवार हे स्वत:चीच चालवायचे, त्यामुळे पक्षाची जी काही चांगली वाईट परिस्थिती असेल त्याची जबाबदारी देखील अजित पवारांचीही होतीच. पण अजित पवारांना हे कोण सांगणार? राष्ट्रवादी एकसंघ असताना जयदत्त क्षीरसागर असतील किंवा आणखी कोणी, राष्ट्रवादी पासून दुरावायला कोण जबाबदार होते हे देखील सर्वांना माहित आहे. तरीही अजित पवारांचे सारे राजकीय नखरे पक्षात सहन केले गेले होते, कारण पक्षाध्यक्ष म्हणून शरद पवार होते. अगदी पहाटेच्या शपथविधी नंतर देखील अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची बक्षिसी देण्याचे राजकीय औदार्य देखील शरद पवारच दाखवू शकतात. तर असे शरद पवारांच्या राजकीय औदार्यावरच मोठे झालेल्या आणि नंतर त्यांनाच पारखे झालेल्या अजित पवारांची आज महायुतीमध्ये काय अवस्था आहे? 
     लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक आकडी जागा दिल्या जाणार हे जवळपास अंतिम आहे. अमित शहांनी आपल्या महाराष्ट्र दौऱ्यात तसे 'सुनावले' देखील आहे. असे जर पूर्वी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या जागा वाटपाच्या बैठकीत कॉंग्रेस नेत्यांनी सांगितले असते तर अजित पवारांनी काय थयथयाट केला असता किंवा कसे तोंड सोडले असते हे महाराष्ट्राला वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र आता तेच अजित पवार भाजपकडून निघालेल्या 'पंचहजारी फर्माना'बद्दल मात्र कांहीच बोलू शकत नाहीत. आपला असा अपमान होत असेल तर दिल्लीला जायचेच कशाला असा सूर भलेही अजित पवारांच्या पक्षातील काही नेत्यांनी लावला असेल, मात्र तरीही अजित पवार दिल्लीला गेले आहेत. अजित पवार काय किंवा एकनाथ शिंदे काय, दिल्लीत गेले काय किंवा कुठेही गेले काय, अमित शहांनी जे ठरविले आहे, त्यापेक्षा वेगळे काही ते देणार नाहीत, फारतर दिल्लीत पोहोचल्यामुळे एखादी जागा वाढवून दिली जाऊ शकेल, पण त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती फार काही सन्मानजनक नसेल हे स्पष्टच आहे. मात्र तरीही हे सारे सहन करणे ही अजित पवारांची राजकीय अपरिहार्यता तर आहेच पण व्यक्तीगत मजबुरी देखील आहे. 
      महाराष्ट्रातील शिंदे- फडणवीस सरकारचे तसे बरे चालले असतानाही त्या गाडीला अजित पवार नावाचा राजकीय डब्बा भाजपने जोडला, तेव्हाच खरेतर भाजपला शरद पवारांचे राजकारण संपवायचे आहे आणि त्यासाठी अजित पवारांचा वापर करायचे आहे हे स्पष्ट होते. त्यामुळे अजित पवारांना महाशक्तीने पक्ष फोडण्यासाठी रसद पुरविली, पण त्याचवेळी अजित पवारांचे नखरे सहन करायचे नाहीत हे देखील ठरविले. म्हणूनच राज्याचे अर्थखाते भलेही अजित पवारांकडे असेल, पण त्यांच्या संचिका देवेंद्र फडणविसां मार्फत मुख्यमंत्र्यांकडे जातात असे सांगितले जाते, अजित पवारांना हे सारे कडूघोट देखील गुमान गिळावे लागत आहेत. कारण अजित पवार काय, एकनाथ शिंदे काय किंवा गेलाबाजार अशोक चव्हाण काय, हे केवळ सत्तेसाठी भाजपसोबत नक्कीच गेलेले नाहीत. त्यांना सत्ता मिळाली हे मान्य, पण सत्तेपेक्षही ईडीची भीती हेच या सर्वांच्या भाजप सोबत जाण्याचे प्रमुख कारण होते. अजूनही महाराष्ट्रातील 'शिखर बॅंक घोटाळा' इडीने बंद केलेला नाही. यातून अजित पवारांना क्लीन चिट देण्यास इडीने विरोध केलेला आहेच, आणि किमान लोकसभा निवडणुका संपेपर्यंत तरी हा विरोध ईडी सोडणार नाही.  राजकीय नखरे दाखवून नॉटरिचेबल व्हायची सवय आता येथे चालणार नाही याची जाणीव अजित पवारांना आहे. समजूत काढायला अमित शहा म्हणजे शरद पवार नाहीत हे एव्हाना अजित पवारांना समजले असेलच. त्यामुळे अमित शहांनी कितीही अपमानित केले तरी हात बांधून दिल्ली दरबारी उभे राहणे हे अजित पवारांचे राजकीय नशीब आहे. नियतीने तो त्यांच्यावर उगवलेला सूड आहे.

 

Advertisement

Advertisement