किल्लेधारूर : येथे एका खाजगी दौऱ्यावर आलेल्या भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मेंढपाळ, वंचित व सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मराठवाड्यात दौरा असून आज सोनपेठ येथे थेट मेंढपाळांच्या पालावर रात्री मुक्काम करणार असल्याची प्रतिक्रिया दै.प्रजापत्रचे प्रतिनिधी सय्यद शाकेरअली यांना दिली.
परळी येथे एका कार्यक्रमा निमित्त भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आले होते. याप्रसंगी धारुर येथील उद्योजक माधव निर्मळ यांच्या उद्योग समुहास त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दै.प्रजापत्र चे प्रतिनिधीशी विविध विषयावर चर्चा केली. याप्रसंगी बोलताना आ. पडळकर यांनी मराठवाड्यात आजही मोठ्या प्रमाणात मेंढपाळ हा पारंपारिक व्यवसाय असून शासन याकडे केवळ एका जातीचा पारंपारिक व्यवसाय म्हणून पाहते. या मेंढपाळाकडे शासनाचे दुर्लक्ष असून याकडे उद्योग म्हणून पाहिल्यास या समुहाला न्याय मिळू शकतो. आजही या वर्गाच्या मोठ्या प्रमाणात समस्या असून त्या जाणून घेण्यासाठी त्यांच्या पालावर जावून आज मुक्काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातून मोठ्या प्रमाणात मेंढी निर्यात केली जाते मात्र त्याचा थेट लाभ मेंढपाळाला मिळत नाही, शेळीमेंढी महामंडळ हे केवळ एखाद्या समुहास खूष करण्याचे साधन आहे. याचा थेट लाभ कधीही हा व्यवसाय करणाऱ्याला होत नाही. केवळ आस्थापनेवर होणाऱ्या खर्चाची तरतूद शासन करत असते असे म्हणत महामंडळ केवळ नावाचे आहे अशी प्रतिक्रिया दिली. पुढे बोलताना सर्वसामान्य, वंचित व गोरगरीबांनी भाजपाच्या छत्राखाली यावे असे आवाहन क
रत लवकरच ऊसतोड मजूरांसाठी रस्त्यावर येणार असल्याचे प्रजापत्रशी वार्तालाप करताना सांगितले.