बीड दि.५ (प्रतिनिधी)-जिल्ह्यात मागच्या दोन-तीन वर्षात गुन्ह्यांचा आलेख सातत्याने वाढत आहे.घरफोड्यांचे वाढते प्रमाण आणि त्याची उकल होण्यात येणारे अपयश हे पोलिसांसमोरचे मोठे आव्हान असून चोरट्यांचा वाढता धुमाकूळ सामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.आयजी वीरेंद्र मिश्रा यांनी बीडच्या वार्षिक तपासणीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना वाढत्या घरफोड्या आणि चोऱ्या रोखण्यासाठी दरोडा प्रतिबंधक पथकाची स्थापना करण्याबाबत सकात्मकता दाखविली होती.मात्र अद्याप ही पथकाची स्थापना पोलीस अधिक्षकांकडून करण्यात आली नाही.काल आणि आज बीड,गेवराई आणि शिरूर कासार तालुक्यात चोरीच्या घटना समोर आल्या असून जिल्ह्यात सातत्याने या घटनेत वाढ होत आहे.त्यामुळे एसपी 'एडीएस' च्या स्थापनेचा मुहूर्त कधी काढतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील टेलिफोन कॉलनी भागात अनिल ज्ञानोबा विश्वाद (वय-६१ ) एका कामानिमित्त पुणे येथे गेलेले होते. या दरम्यान त्यांचे घर कुलूप बंद होते. चोरांनी या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील ४० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या ५ ग्रॅम वजनाच्या २ अंगठ्या तसेच १२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे इतर दागिने असा एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पुण्याहून घरी परतल्यानंतर हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.तर गेवराई तालुक्यातील सिरसदेवी फाटा येथील दोन किराणा दुकानाचे पत्र्याचे शटर उचकटून चोरट्यांनी आतमधील रोख रक्कम आणि किराणामाल चोरून नेला.ही घटना 3 ते 4 मार्चच्या मध्यरात्री ते सकाळच्या सुमारास घडली. दरम्यान चोरट्यांनी तलवाडा पोलीसांना एकप्रकारे आव्हान दिल्याची चर्चा परिसरात या घटनेनंतर झाली.याबाबत आदित्य विठ्ठल थोपटे (रा.अर्धमसला,ता.गेवराई) यांनी तलवाडा ठाण्यात तक्रार नोंदवली. थोपटे यांचे सिरसदेवी फाटा येथे विठाई हे किराणा दुकान असून त्यांच्या दुकानाच्या शेजारी त्यांच्या मित्राचे जय हनुमान किराणा दुकान आहे. 3 ते 4 मार्चच्या मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी या दोन्ही दुकानांचे पत्रे उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर दोन्ही दुकानाच्या गल्ल्यातील रोख रक्कम व किराणा माल असा एकूण 67 हजारांचा माल चोरून नेला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर आदित्य थोपटे यांनी तलवाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत.
तिसरी घटना शिरूर कासार तालुक्यातील तागडगाव परिसरात घडली आहे.विद्युत पंप आणि पाईप चोरून नेणार्या चोरट्यांनी या भागात चांगलाच धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर येत आहे. शेतकरी सचिन मिठू कुलकर्णी (रा. तागडगाव, ता.शिरूरकासार) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कुलकर्णी यांची तागडगाव शिवारात शेती आहे; त्या शेतामध्ये सध्या त्यांनी ऊस व इतर पिके घेतलेले आहेत. या पिकांना ते उथळा तलावावरील विहिरीतून पाणी देतात. 3 मार्च रोजी विद्युत पंप सुरू करून पिकांना पाणी देऊन कुलकर्णी सायंकाळी पंप बंद करून घरी गेले होते. नंतर मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या विहिरीवरील 15 हजार रुपये किमतीचा विद्युत पंप आणि 5 हजार रुपये किमतीचा पाईप चोरुन सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर सचिन कुलकर्णी यांनी आजूबाजूच्या शेतकर्यांकडे याबाबत विचारपूस केली असता गावातील त्यांच्या विहिरीच्या आसपास असलेल्या ज्ञानदेव पवार, प्रल्हाद पवार, भागवत सानप, श्रीराम सानप व चंद्रकांत सानप या पाच शेतकर्यांच्या विहिरीवरील विद्युत पंप चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. कुलकर्णी यांनी दिलेल्या तक्रारीवरून विद्युत पंप आणि पाईप चोरी झाल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल बाबासाहेब सोनवणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
साक्षाळपिंप्रीच्या व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
बीड-तालुक्यातील साक्षाळपिंप्री येथे चोरट्याने रात्री धुमाकूळ घातला. यामध्ये सहा दुकानात चोरीच्या घटना घडल्या असून नगदी रकमेसह इतर साहित्य चोरट्याने चोरून नेले आहे. आज सकाळी पंचनामा करण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
जयभवानी जनरल स्टोअर्स, सरस्वती ट्रेडर्स, कृष्णा मेडिकल, नगदनारायण हार्डवेअर, लालदंत मेडिकल, व सुनिल बापुराव बेदरे यांचे दुकान अशा सहा दुकानांमध्ये रात्री चोरीची घटना घडल. यामध्ये चोरट्याने नलावडे यांच्या दुकानातील दीड हजार, सपकाळ यांच्या दुकानातील काही रक्कम व इतर दुकानदारांच्या गल्ल्यातील पैसे व इतर साहित्य चोरून नेले. एकाच रात्री सहा दुकानांत चोरीच्या घटना घडल्याने साक्षाळपिंप्री येथील व्यापार्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी बीड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला.
दरोडा प्रतिबंधक पथकाला कोणाचे अडथळे ?
२०२२ मध्ये बीड जिल्ह्यात नोंद झालेल्या चोऱ्या ११६९ होत्या. तोच आकडा २०२३ मध्ये १५०० च्या पुढे गेला तर चालू वर्षाच्या जानेवारी महिन्यात तो आकडा ७८ वर आणि फेब्रुवारीमध्ये देखील त्याच्या आसपास आहे.तिच अवस्था घरफोड्यांची आहे.घरफोडीचा आकडाही सातत्याने वाढत आहे. २०२३ मध्ये २६३ गुन्हे दाखल झाले होते. तर एकट्या जानेवारी महिन्यात घरफोडीचे २२ गुन्हे दाखल आहेत.मात्र उघडकीस आणण्याचे प्रमाण निम्मे ही नाही.त्यामुळे आयजी वीरेंद्र मिश्रा यांनी स्वतः दरोडा प्रतिबंधक पथकासाठी पोलीस अधिक्षक यांना निर्णय घेण्याबाबत कळविले होते.मात्र अजूनही याचा निर्णय झालेला नाही.तर दुसरीकडे चोऱ्या आणि घरफोड्यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.त्यामुळे एसपींना वरिष्ठांचे आदेश असतानाही दरोडा प्रतिबंधक पथक अजूनही का स्थापन होत नाही हा सामन्यांना पडलेला प्रश्न आहे.