नेकनूर-येथील आठवडी बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांच्या वाहनांना अडवून नेकनूर पोलीस लूट करत असल्याच्या आरोप करत आज (दि.२५) संतप्त व्यापाऱ्यांनी पोलीस ठाण्यालाच चक्क घेराव घालत तक्रार दिली.सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी यावेळी व्यापाऱ्यांची समजूत काढत चौकशी करून कारवाई करू असे आश्वासन दिल्याची माहिती आहे.जिल्ह्यात पोलिसांनीच सुरु केलेल्या या लुटीची सध्या प्रचंड चर्चा सुरु असून आयजी उद्या जिल्ह्यात दाखल होत असताना पोलिसांचे असे वर्तन चिंतेची बाब मानली जात आहे.
बीड तालुक्यातील ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत,त्यात नेकनूरच्या बाजाला महत्वाचे स्थान आहे.या बाजारात जनावरांची खरेदी-विक्री करण्यासाठी शेतकरी हजारोंच्या संख्येने दाखल होत असतात.आज आठवडी बाजार असताना व्यापारी आणि शेतकरी बाजारात जातेवेळी काही वाहनांना नेकनूर पोलिसांनी अडवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केल्याचे सांगण्यात येते.मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने असे प्रकार सुरु होते.अनेकदा माहिती देऊनही वरिष्ठ अधिकारी याची दखल घेतं घेतनव्हते.मात्र आज पुन्हा असा प्रकार घडल्यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस ठाण्यालाच घेराव घालत पोलीस नाईक श्री.बांगर यांच्याविरोधात तक्रार देण्यासाठी प्रचंड गर्दी केली.मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी व्यापाऱ्यांची समजूत काढत चौकशी करू असे आश्वासन दिल्याचे कळते.दरम्यान सातत्याने घडणाऱ्या याप्रकारमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असताना पोलीस अधिक्षक कठोर भूमिका घेणार का ? हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.