राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर पक्षचिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे पक्षचिन्ह आहे. पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून ही माहिती देण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षनाव व घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिला होता. त्यानंतर शरद पवार गटाला नेमकं कोणतं नाव किंवा चिन्ह मिळणार? याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. त्यासाठी शरद पवार गटाकडून तीन नावांचे पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते. त्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव देण्यात आलं. परंतु, हे नाव येत्या २८ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीपुरतं होतं. त्यामुळे या निवडणुकीकरता पक्षाला चिन्ह देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे हे प्रकरण शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात नेले होते. आता या प्रकरणी जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं आहे. एका योद्ध्याला शोभेल असंच हे पक्षचिन्ह आहे. ८४ वर्षांचा म्हातारा, होय मी त्यांना असंच म्हणतो. कारण ८६ वर्षांचा म्हातारा युद्धाला उभा राहिला आहे आणि संकेत काय मिळाले आहेत? तर तुतारी. वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी. तुतारी वाजली आहे, युद्धासाठी आम्ही आता तयार आहोत. शरद पवार युद्धाला उभे आहेत. महाराष्ट्रातल्या राजकीय भूमीतले भीष्माचार्य म्हणजे शरद पवार त्यांच्यासह आम्ही ही लढाई लढण्यासाठी तयार आहोत. लडेंगे और जितेंगे.. परत एकदा सांगतो.. वाजवा तुतारी. असं म्हणत जितेंद्र आव्हाडांनी प्रतिक्रिया दिली आहे.