Advertisement

संपादकीय अग्रलेख - विचारांचा व्हावा जागर

प्रजापत्र | Monday, 19/02/2024
बातमी शेअर करा

 
     रयतेचे हित हे कोणत्याही राज्यकर्त्याचे सर्वोच्च कर्तव्य आहे, याच भावनेतून छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य चालविले. आज शेकडो वर्षांनंतरही त्यांच्यासारखा राजा झाला नाही म्हणून समस्त जनतेची मान त्यांच्यापुढे आदराने झुकते. महाराष्ट्राचे प्रेरणा, उर्जा, स्फूर्ती आणि शक्तीस्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करताना, छत्रपतींच्या महाराष्ट्रात आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असे समाजकारण, राजकारण चालू आहे का? आणि शिवछत्रपतींची जयंती उत्साहाने साजरी करणारे आपण सारेच त्यांच्या विचारांना डोक्यात घेत आहोत का याचेही आत्मचिंतन कोठेतरी व्हायला हवे.
 

 

    महाराष्ट्राला ज्यांनी स्वाभिमान, शक्ती, ऊर्जा आणि खऱ्याअर्थाने आपलेपणा दिला, राजे असतानाही, शेकडो वर्षांपूर्वी ज्यांनी लोकशाही विचारांचे बीजारोपण केले,ज्यांनी मानवतेला सर्वोच्च प्राधान्य दिले आणि राजा रयतेसाठी असतो याचे उदाहरण घालून दिले, त्या कुळवाडीभूषण छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती. छत्रपती शिवाजी महाराज हे एक असामान्य व्यक्तिमत्व होते, त्यामुळे साहजिकच त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेकविध पैलू आहेत. आपण त्यांच्यातील कोणता पैलू घेऊन पुढे जायचे हे साहजिकच ज्याच्या त्याच्या वैचारिक कुवतीवर आणि हेतूवर देखील अवलंबून असते. मात्र आदर्श राज्यकारभार कसा असतो याचे जे व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिले होते, आज कोठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्याच विचारांचा जागर अधिक जोरकसपणे व्हायला हवा.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र म्हणून ज्या महाराष्ट्राकडे पाहतात, त्या महाराष्ट्राची आजची अवस्था काय आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी हिंदवी स्वराज्य उभारले होते, ते काही कोणा एका जातीसाठी, केवळ आपल्या 'सग्यासोयऱ्यां'साठी निश्चितच नव्हते आणि 'स्वराज्य' उभारणीत शिवरायांनी आपल्या सोबतीला देखील केवळ कोणा एका जातीला घेतले नव्हते, तर सर्व मावळ्यांना घेऊन शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली होती. शिवरायांचे स्वराज्य हे सर्व जाती धर्माच्या रयतेचे राज्य होते, ते कोणा एका समूहासाठी नव्हते आणि म्हणूनच तेव्हापासूनची गावगाड्यात सर्व समाजघटक गुण्यागोविंदाने नांदतात ही आपल्या महाराष्ट्राची ओळख होती. मागची काही वर्ष सोडली, तर स्वातंत्र्योत्तर काळातील महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी देखील सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊनच मार्गक्रमण केले. त्यामुळे काही अपवाद वगळता (दलित -सवर्ण किंवा ब्राह्मण -ब्राह्मणेतर)  महाराष्ट्रात जातीय आधारावर विभागणी आणि विद्वेष कधी फारसा झाला नव्हता. मात्र त्याच महाराष्ट्राची अवस्था आणि चित्र आज काय आहे? मागच्या काही महिन्यात राज्यात मराठा-ओबीसी हा जो वाद निर्माण केला गेला आहे आणि सरकारी आशीर्वादाने जो सातत्याने वाढत आहे, त्यामुळे गावागावात निर्माण झालेली दुही काय सांगते? ही दुही कमी व्हावी यासाठी राज्यकर्ते म्हणून सरकारमधील व्यक्तींनी काय प्रयत्न केले? उलट सरकारमधील वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या दिशेने तोंडे करून ही दुही वाढविण्यासाठीच प्रयत्न केले नाहीत का? आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने सर्वांना दिला आहे, पण म्हणून आपले आंदोलन इतरांच्यासाठी अडचणीचे ठरू नये, आपल्या आंदोलनाचा त्रास इतरांना होऊ नये हे पाहणे आंदोलकांचे कर्तव्य आहे, हे जर आंदोलक लक्षात घेणार नसतील तर सरकारने ते सांगण्याची धमक दाखवायला हवी.  सोबत घेऊन जाताना सर्वांशी समन्यायी पद्धतीने वागायचे असते हा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता, आजच्या राज्यकर्त्यांमध्ये, मग ते सत्तेतले असोत व विरोधातले हा विचार कोठे दिसत आहे का? तसा असता, तर आज महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण इतके संभ्रमित बनले असते का?

 

 

     छत्रपती शिवाजी महाराज साऱ्या राष्ट्राचे श्रद्धास्थान, स्फूर्तिस्थान आहेत, त्यामुळे त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आत्मचिंतन करून त्यांचे विचार आपण खरोखरच आत्मसात करीत आहोत का हे तपासायलाच हवे. आजच्या निमित्ताने तरी कितीही कटू असले तरी आपण जर शिवरायांच्या नावाचा जयघोष करीत असू तर त्या अगोदर खरोखर आपण त्यांच्या विचारांशी आपल्या वागण्यातून 'प्रतारणा' करीत नाहीत इतका विश्वास आपण छत्रपती शिवाजी महाराजांना देणार आहोत का? आजच्या महाराष्ट्रातील सामाजिक एकोपा पार धुळीस मिळत असताना शिवभक्त म्हणविणाऱ्या आमची भूमिका काय आहे? आंदोलक किंवा राजकारणी भलेही  'गावगाड्यात आम्ही सारे एकत्र आहोत' असे सांगत असतील, मात्र आज गावागावात सामाजिक अस्वस्थेतची दरी निर्माण झालेली आहे हे वास्तव आहे. ही दरी दूर करण्यासाठी  लोकप्रतिनिधींनी, सरकारने, विरोधकांनी प्रयत्न करायला हवे होते, मात्र तसे होताना दिसत नाही. कोणालाच दुखवायचे नाही आणि कॊणालाच काही द्यायचे देखील नाही. कोणालाच तुमचे चूक आहे किंवा तुम्ही करताय ते योग्य आहे असे ठणकावून सांगायचे देखील नाही असे सारे सरकार आणि विरोधकांचे सुरु आहे, मग हे राज्य शिवछत्रपतींच्या विचारांनी चालले आहे असे म्हणता येईल का? आपल्या जवळचा आणि कितीही मात्तबर सरदार चुकला तर 'तुमचं चुकलं ' असे ठामपणे सांगण्याचा विचार शिवाजी महाराजांनी दिला होता. रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागू नये असे सांगणारे शिवाजी महाराज, युद्धाच्या काळातही रयत होरपळले जाऊ नये याचा प्राधान्याने विचार करणारे शिवाजी महाराज कोठे आणि झुंडीसमोर हतबल होऊन सामान्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान पाहात बसणारे आजचे राज्यकर्ते कोठे? मग आज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन आपली वाटचाल सुरु आहे असे म्हणता येणार आहे का? तसे म्हणता यावे अशी परिस्थिती निर्माण करणे ही जवाबदारी साहजिकच छत्रपतींना आराध्य मानणाऱ्या सर्वांची आहे आणि त्यासाठीच आज शिवरायांच्या नावाच्या गजरासोबतच त्यांच्या विचारांचा जागर होणे अधिक आवश्यक व महत्वाचे आहे.

 

Advertisement

Advertisement