Advertisement

 कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र वाटपात बीड जिल्हा मराठवाडयात अव्वल

प्रजापत्र | Saturday, 17/02/2024
बातमी शेअर करा

बीड-  राज्यभरात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्याचे काम युध्द पातळीवर होत आहे. मराठवाडयात आतापर्यंत सुमारे ४२ हजार कुणबी नोंदी सापडल्या असून यातील १९ हजाराहून अधिक नोंदी एकटया बीड जिल्ह्यातील आहेत. त्यासोबतच कुणबी प्रमाणपत्र वाटपातही बीड जिल्हा मराठवाडयात अव्वल आहे. या जिल्ह्यातून आतापर्यंत २१ हजार ७७६ कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत. धाराशिव मधून ४१४९ तर लातूरमध्ये अवघे ८१६ प्रमाणपत्र वाटण्यात आले आहेत. 

 

राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेण्यात आल्यानंतर बीड जिल्ह्यात प्रशासनाने मोठया प्रमाणावर काम केले. सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील प्रशासनाला मदत केली. परिणामी बीड जिल्ह्यात मराठवाडयात सर्वाधिक नोंदी सापडल्या आहेत. विशेषतः भूमी अभिलेख विभागाच्या अखत्यारीत असलेल्या नमुना ३२,३३ मधील नोंदींची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात सुमारे २२ लाखांहून अधिक अभिलेख तपासण्यासात आले आहेत. जिल्हयातील ४६५ गावांमध्ये या कुणबी नोंदी सापडल्या. या नोंदींची संख्या १९ हजार ९२४ इतकी झाली आहे. 
कुणबी नोंदी शोधण्यासोबतच कुणबी प्रमाणपत्र देण्यात देखील प्रशासनाने तत्परता दाखविली आहे. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ -मुंडे, नोडल अधिकारी असलेले निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांचा पाठपुरावा आणि सर्वच उपविभागीय अधिकाऱ्यांनी केलेल्या कार्ययवाहीतून बीड जिल्ह्यात आतापर्यंत २१ हजार ७७६ प्रमाणपत्रांचे वितरण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी दिली.हा आकडा मराठवाडयात सर्वाधिक आहे. 
 

 

जालनाही पिछाडीवर
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यात चर्चेत असलेला जालना जिल्हा कुणबी नोंदी आणि प्रमाणपत्र वाटपात मात्र पिछाडीवर आहे. या जिल्ह्यात ४६६४ नोंदी सापडल्या असून ४६९३ प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहेत. 

 

 

अशी आहे मराठवाड्याची आकडेवारी
जिल्हा                 नोंदी          वाटप प्रमाणपत्र
बीड                १९९२४            २१७७६
धाराशिव             ३४५७              ४१४९
लातूर                    ९६६                ८१६
छ. संभाजीनगर   ४६१३               २४९५
जालना               ४६६४              ४६९३
परभणी              ३३५१               ३७२१
हिंगोली               ४१६७                ८५२
नांदेड                  १७४९                ९९३

 

Advertisement

Advertisement