कोणत्याही लोकशाहीमध्ये सत्ताधाऱ्यांइतकाच महत्वाचा असतो तो विरोधी पक्ष, पण आजच्या सत्ताधाऱ्यांची, म्हणजे भाजपची एकंदरच मानसिकता आहे , ती विरोधी पक्षाचे अस्तित्वच संपविण्याची . विरोधी पक्षातील नेत्यांना कसेही करून भाजपात ओढायचे आणि अशा पद्धतीने विरोधीपक्ष संपवायचा हेच धोरण सध्या भाजपने स्वीकारले आहे. त्यामुळे आता काँग्रेसचा राजीनामा दिलेल्या अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता होईन जाईलच. त्यात काही आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.पण मूळ मुद्दा आहे तो इतकाच की, एकीकडे भाजप आपणच महाशक्ती आहोत आणि लोकसभेच्या चारशेपार जागा जिंकणार आहोत असे सांगत आहे, तर दुरसीकडे अजूनही भाजपला वेगवेगळ्या पक्षातील बडे नेते कशासाठी हवे आहेत ? भाजपला अजूनही स्वतःच्या शक्तीवर विजयाची खात्री नाही का ?
महाराष्ट्रातील काँग्रेसचे बडे नेते असलेल्या माजी मुख्यमंत्री अधिक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत आणखी काही आमदारांनी राजीनामा दिला आहे. मागच्या चार वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात 'महाशक्ती'ने शिवसेनेत आणि राष्ट्रवादीत फूट घडवून आणली होती. मागची चार साडेचार वर्ष एकसंघ राहिला होता तो काँग्रेस. आता त्या काँग्रेसलाही खिंडार पाडण्यात भाजपला यश आले असे म्हणता येईल. असेही अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडण्याची घटना खरेतर यापूर्वीच घडणार होती, मात्र त्यावेळी कदाचित 'महाशक्ती 'ला त्याची आवश्यकता वाटली नसेल . म्हणूनच अशोक चव्हाण इतके दिवस थांबले होते . आता अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आणि पुढील २-३ दिवसात त्यांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता देखील पूर्ण होऊन जाईल. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात काँग्रेसला देखील खिळखिळे करण्यात भाजप यशस्वी झाला असेच म्हणावे लागेल.
प्रश्न आहे तो भाजप हे सारे कशासाठी करीत आहे याचा ? एकीकडे काँग्रेस पक्ष भ्रष्टाराचा मेरुमणी आहे असे म्हणायचे , काँग्रेसवाल्यानी इतक्या वर्षात काहीच केले नाही असे म्हणायचे आणि त्याचवेळी काँग्रेस काय किंवा इतर विरोधी पक्षातील नेते काय , त्यांना भपमध्ये घ्यायचे , हे सारे दुटप्पीपणाचे आहे. कारण नरेंद्र मोदी आरोप करतात तसा जर काँग्रेस पक्ष वाईट असेल तर साहजिकच काँग्रेस पक्षातील बडे नेते देखील तसेच असणार ? ज्यावेळी काँग्रेस पक्षावर नाकर्तेपणाचा आरोप केला जातो , त्यावेळी साहजिकच ज्यांच्या हाती काँग्रेसची सूत्रे होती, ते विखे काय किंवा आताचे अशोक चव्हाण काय, हे कर्तबगार कसे ठरतील ? मग असल्या नाकर्त्यांना सोबत घेण्यामागे भाजपची काय मजबुरी आहे ? आजच्या तारखेत भाजपकडून ज्यापद्धतीने सत्तेचा गैरवापर सुरु आहे, ते पाहता , ज्यांनी सत्तेच्या पदावर काही कालावधी काढला आहे, ज्यांच्या संस्थांचे मोठे जाळे आहे आणि ज्यांची 'उलाढाल ' मोठी आहे अशांना भाजपपुरस्कृत ईडी सारख्या संस्थांचा सामना करणे शक्यच नाही, त्यामुळे मग थेट भाजपसमोर लोटांगण घालणे आणि भाजपवासी होणे यातच त्यांना स्वतःचे हित वाटणार असेल तर त्यात आश्चर्य ते कसले ? पण भाजपला या सर्वांची आवश्यकता का वाटत आहे ? देशाचे सोडा , अगोदर महाराष्ट्राचे पाहू. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर भाजपला विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष झालेला असतानाही सत्तेत येत आले नव्हते. त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरकारबद्दल भाजपला आकस असणे एकवेळ समजू शकते. त्यासाठी मग त्यांनी अगदी राजभवनाच्या देखील वापर केला आणि शिवसेनेतच फूट पडली, पण तरीही मुख्यमंत्रीपद मात्र भाजपच्या वाट्याला आलेच नाही. त्यानंतर खरेतर शिंदेंचे सरकार अस्थिर नव्हते, किंवा त्यांच्याकडे संख्याबळाची देखील अडचण नव्हती, तरीही ज्या अजित पवारांना भाजपवाले शिव्या देत होते, ज्या
अजित पवारांच्या नावाने शिंदेसेना दूषणे देत होती, त्याच अजित पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये फूट घडवून आणण्याची आणि त्यांना सत्तेत सोबत घेण्याची नेमकी काय गरज भाजपला होती ? एकनाथ शिंदे सोबत आल्यानंतर देखील महाराष्ट्राची वाट अवघड आहे याच भीतीने तर अजित पवारांना सोबत घेतले गेले नव्हते ना ? आणि आता अर्ध्यापेक्षा अधिक मूळ शिवसेना आणि तितकीच मूळ राष्ट्रवादी सोबत असतानाही भाजपला काँग्रेसचे लोक हवे असतात याचा अर्थ काय ? तर तो स्पष्ट आहे, अजूनही राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांवतर आपल्याला बहुमत मिळेल याची खात्री भाजपला नाही. आतापर्यंतचे सारे सर्व्हे महाविकास आघाडीच्या बाजूचे आहेत आणि म्हणूनच विरोधी पक्षांचे नेतेच पळवून लोकसभेसाठीचे सत्तेचे गणित भाजपला जुळवायचे आहे,भाजप वरून कितीही गमजा मारीत असला तरी आतून धास्तावलेले आहे हेच खरे.