बीड दि. ३० (प्रतिनिधी ) : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार पुन्हा एकदा पोलीस दलामध्ये बदल्यांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणूक आयोगाच्या नव्या निर्देशानुसार आता पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी एका जिल्ह्यत ठाणे अथवा कोणत्याही शाखेत मागील चार पैकी तीन वर्ष काम केले असेल तर त्यांची बदली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्थानिक गुन्हे शाखेसह आणखी काही शाखांचे अधिकारी बदलीच्या रडारवर आहेत.
बीड जिल्हा पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांच्या पोलीस अधीक्षकांनी तर काहींच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी (आयजी ) बदल्या केल्या होत्या. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या करतांना सेवा कालावधी कोणता ग्राह्य धरायचा यावरून काही मुद्द्यांवर निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यात आता निवडणूक आयोगाने एखाद्या अधिकाऱ्याने एखाद्या जिल्ह्यात पोलीस ठाणे किंवा विशेष अशी कोणतीही शाखा यामध्ये मागच्या चारपैकी तीन वर्ष सेवा केली असेल तर असे अधिकारी बदलीपात्र आहेत असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील काही पोलीस अधिकारी बदलीच्या रडारवर आले आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखा , जिल्हा विशेष शाखा यासह काही ठाण्यांच्या ठाणेदारांचा देखील समावेश आता बदलीपात्रच्या यादीत होणार असल्याचे संकेत असून येत्या दोन दिवसात जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांमध्ये आणखी काय बदल होतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.