बीड - देशभरामध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विविद कामे केली जातात. तालुका पातळीवर हजेरी मस्टर काढले जात होते, मात्र राज्यात त्यात बदल करून ग्रामपंचायतमध्ये मस्टर काढण्याचा निर्णय मध्यंतरी घेण्यात आला. मस्टर काढण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांना रोहयो विभागाकडून टॅब देण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात ११७० ग्रामरोजगार सेवक असून या सर्वांना लवकरच टॅब उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
काही दिवसांपूर्वी रोहयो विभागाने गावपातळीवर मजुरांचे हजेरी मस्टर काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी प्रत्येक ग्रामरोजगार सेवकांना त्या त्या पंचायत समिती अंतर्गत प्रशिक्षण देण्यात आले आहे. सध्या काही ठिकाणी मस्टर काढण्यास सुरुवात झाली. मस्टर काढण्यासाठी ग्रामरोजगार सेवकांना टॅब उपलब्ध करून देण्याचा निर्णय रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांनी घेतला. त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यात ११७० ग्रामरोजगार सेवक आहेत. या सर्वांना लवकरच टॅब मिळणार आहे. यापूर्वी ग्रामरोजगार सेवकांना खुर्ची, टेबल, अलमारी इत्यादी साहित्य देण्यात आलेले होते.