एखाद्या व्यक्तीला मोठेपण द्यायला हरकत नाही, अगदी भगवान म्हणवणाऱ्या रामाला देखील आम्ही घर दिले असे सांगणारांवर आचार्य म्हणविणारांनी देखील स्तुतीसुमने उधळल्यास त्यात आजच्या काळात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, पण म्हणून एखाद्याला थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंक्तीला नेऊन बसविणे हा शिवरायांचा अवमान आहे. किमान गोविंददेव गिरींच्या उंचीला तरी हे शोभणारे नाही. छत्रपतींच्या राज्यात प्रत्येक सामान्यांच्या जीवित रक्षणाची हमी होती, त्यांच्या राज्यात ना कधी वांशिक हत्याकांड घडले, ना त्यांच्या राज्यात महिलांवर अत्याचार करणारांना माफी मिळाली, मग आचार्य गोविंददेव गिरींना नरेंद्र मोदींमध्ये शिवरायांचे गुण तरी कोणते दिसले असतील?
सध्या साऱ्या देशातील वातावरण राममय झालेले आहे. राम मंदिरासाठीचा या देशातील बहुसंख्यांक असणाऱ्या समाजातील काही घटकांचा अनेक पिढ्यांचा संघर्ष आहे, हे नाकारता येणार नाही. कारसेवा ही कृती कायदेशीर होती का नाही, यावर भाष्य करण्यात आता काही अर्थ नाही, मात्र याला धार्मिकतेशी जोडले गेले. मुळात राम ,कृष्ण , शिव ही आपली सांस्कृतिक ओळख आहे पण म्हणून त्याचे राजकीयकरणं आतापर्यंत केले गेले नव्हते. ते भाजप, संघ परिवार यांना साधले आणि त्यामुळेच राम मंदिर लोकार्पण किंवा मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या निमित्ताने देशभरात दिवाळी साजरी करण्यात आली. या प्राणप्रतिष्ठापनेच्या आडून नरेंद्र मोदींच्या कौतुकाचे नवे 'मोदीयन' म्हणा किंवा 'नरेंद्रायण' म्हणा सध्या देशभरात सुरु आहे. अर्थात ज्यांना राजकारण करायचे आहे, त्यांनी 'नरेंद्रायण ' मधील दोह्यांचे पारायण करायला हरकत नाही, पण ज्यांच्याकडे सारा देश वेगळ्या आस्थेने पाहतो, ज्यांच्या रामकथेने देशाला भक्तिरसाची एक वेगळी अनुभूती दिली, ते पूर्वाश्रमीचे किशोरजी व्यास आणि आजचे आचार्य गोविंददेव गिरीजी यांना देखील 'नरेंद्र कथेचा' मोह आवरु नये, याचे खरोखरच अनेकांना वैषम्य वाटल्याशिवाय राहिले नसेल. एखाद्या चांगल्या गोष्टीचे, पराक्रमाचे, धर्मकार्याचे , अगदी अनुष्ठानाचे देखील कौतुक व्हायला हवे, ते गोविंददेव गिरीजी यांनी केले म्हणून फारसे काही बिघडत नाही, पण हे कौतुक करताना आपण कोणाची तुलना कोणाशी करीत आहोत याचे भान असायला हवे असते. गोविंददेव गिरीजी यांच्याबद्दल साऱ्या देशातील आस्थावानांना एक वेगळा आदर आहे. ते काही कोणत्या दरबारातील स्तुतिपाठकांसारखे नक्कीच नाहीत, त्यामुळेच जेव्हा गोविंददेव गिरिजींना नरेंद्र मोदींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसतात, त्यावेळी कोठेतरी खूप काही चुकल्यासारखे वाटते.
छत्रपती शिवाजी महाराज हे राजेशाहीच्या काळात देखील लोकशाहीचा आदर्श वस्तुपाठ होते. ज्यावेळी सर्वत्र 'राजा बोले दल हले' सारखी परिस्थिती होती, त्यावेळी छत्रपतींनी अष्टप्रधानमंडळ नेमून त्यांच्या सल्ल्याने राज्यकारभाराचे सूत्र घालून दिले होते. आज लोकशाहीमध्ये मंत्रिमंडळ आहे, मात्र मंत्रिमंडळाला अधिकार किती आहेत? मंत्रिमंडळातील किती मंत्र्यांना स्वतःचा 'आवाज' आहे? देशाची सत्ता कोणाच्या 'मन की बात ने' चालते हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, मग नरेंद्र मोदींमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दिसावी तरी कशी? महिलांसोबत गैरवर्तन करणारा कोणीही असला तरी त्याला शिक्षा करणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य कोठे आणि एखाद्या महिलेवर बलात्कार करून तिच्या कुटुंबातील व्यक्तींची कत्तल करणाऱ्या नराधमांना माफी देणारे आजचे राज्य कोठे? अगदी शत्रू पक्षातील सुभेदाराच्या सुनेची देखील सन्मानाने रवानगी करणारे स्वराज्य आणि आपल्याच देशातील महिला कुस्तीपटूंना लैंगिक शोषणामुळे कुस्तीला राम राम ठोकण्याची वेळ आलेले कल्याणकारी (?) राज्य कोठे? नेमकी तुलना करायची तरी कशाची आणि कशासोबत? स्वतःच्या सैन्यासाठी जीवाचे रान करणारे छत्रपती शिवाजी महाराज, आणि पुलवामा मध्ये धोका आहे अशी सूचना मिळाल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष करणारी केंद्रीय सत्ता, अशी उदाहरणे तरी किती द्यायची? रायगडावर मस्जिद बांधण्याची व्यवस्था करणारे छत्रपती आणि मस्जिद पाडणारांचा सन्मान करणारे आजचे राज्यकर्ते, सर्व धर्मांचा आदर करणारे छत्रपती आणि धार्मिक विद्वेष पसरविणारे आजचे राज्यकर्ते, आपल्या राज्यातील प्रत्यक नागरिकांचे रक्षण ही आपली जबाबदारी आहे असे मानणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि वांशिक हत्याकांड होत असताना चुप्पी साधणारे आजचे राज्यकर्ते, तरीही आचार्यांना आजच्या राज्यकर्त्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज दिसावेत हे बुद्धीला न पटणारे आहे.
आचार्यांना भलेही राम समजले असतील, भगवान रामांबद्दल त्यांचा अभ्यास मोठा आहे, अधिकार देखील मोठा आहे, पण म्हणून ते नरेंद्र मोदींची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी करणार असतील, तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज काहीच समजले नाहीत असेच म्हणावे लागेल. एका आदर्श राजाचा सन्मान आचार्यांसारखी माणसे वाढवू शकणार नसतील तरी हरकत नाही, पण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना नक्कीच नाही. त्यांनी भलेही 'नरेंद्रायण' कितीही सांगावे पण छत्रपती शिवाजी महाराजांसोबतची इतरांची तुलना टाळावी इतकीच अपेक्षा.