परळी - शहरातील मोंढा विभागात मकर संक्रातीसाठी सुगडे विकण्यास बसलेल्या उद्धव कुंभार यास जागेच्या कारणावरून मोंढयातील फळ विक्रेत्यांच्या गटाने रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास जबर मारहाण केली.मध्यस्थी करण्यास गेलेल्यांना देखील मारहाण झाल्याने बाजारपेठेत एकच गोंधळ उडाला. दरम्यान या प्रकरणी ३० जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . घटनास्थळास रात्री बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर ,आंबेजोगाई च्या अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तिडके मॅडम अंबाजोगाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांनी भेटी दिल्या आहेत.
मकरसक्रांतीनिमित्त येथील राणी लक्ष्मीबाई टावर ते मोंढा मार्केट दरम्यान रस्त्यावर फळ विक्रेते व इतर वाण विक्रीचे गाडे लावण्यात आले आहेत. उद्धव कुंभार हा रविवारी दुपारी मोंढा भागात सुगडे विकण्यासाठी बसला.तेथे बसण्यास फळ विक्रेत्यांनी विरोध केला. त्यामुळे उद्धव हा भांड्याचे व्यापारी शाम वानरे यांच्या दुकानाजवळ येवून बसला. दरम्यान, रविवारी रात्री ८.३० वाजता फळ विक्रेत्यांच्या एका गटाने कुंभार यांना मारहाण केली. यावेळी वानरे यांच्या भांड्याच्या दुकानातही गोंधळ घातला . त्यामुळे वातावरण तणावाचे झाले.