बीड - केंद्र सरकार कोणताही कायदा बनवताना डोकं ठिकाणावर ठेवून बनवत नाही, त्यामुळे केंद्र सरकारने डोकं ठिकाणावर ठेवून कायदा बनवावा. या कायद्यामुळे केवळ वाहन चालकांनाच नाहीतर प्रत्येक व्यक्तीला याचा त्रास होणार असल्याचे सांगत आमदार संदीप क्षीरसागर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
बीडमध्ये हिट अँड रन कायदा विरोधात आता शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आक्रमक झाले आहेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हजारो चालकांचा मोर्चा काढण्यात आला आहे. तसेच कायद्यात बदल केला नाही तर आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा क्षीरसागर यांनी दिला आहे.
अधिवेशनात प्रश्न मांडणार
साधं दुचाकी धारकाकडून देखील अचानक नजर चुकीने अपघात झाला तर त्याला याचा त्रास होणार आहे. त्यामुळे २० कोटी चालकांनाच नाही; तर देशातील प्रत्येकाला याचा त्रास होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा. अन्यथा देशभर आंदोलन होईल आणि आम्ही देखील येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करू. त्याचबरोबर अधिवेशनात देखील याविषयी प्रश्न मांडू. असा इशारा आमदार संदीप क्षीरसागर यांनी बोलताना दिला आहे..