बीड- जिल्ह्यातील गर्भलिंग निदान व गर्भपात तसेच गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार वाढू लागले असून यामध्ये एक रॅकेट सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकाराची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘लेक वाचवा’ आक्रोश आंदोलन करण्यात आले.
गेल्या काही दिवसांपूर्वी गेवराई येथे गर्भलिंदग निदान प्रकरणाचा भांडाफोड झाला. यात काही लोकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्याचबरोबर गर्भाशय काढणे याचेही प्रकार वाढू लागले असून या सर्व प्रकरणांची एसआयटीमार्फत चौकशी करून दोषींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या वेळी डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस, सुदाम तांदळे, शेख मुबीन, शिवशर्मा शेलार, हमीद खान पठाण, शेख जावेद, हरीओम क्षीरसागर यांच्यासह आदींची उपस्थिती होती.