बीड: शिवसेना (उबाठा) मध्ये मागच्या काही काळापासून अस्वस्थ असलेले माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी अखेर शिवसेना (उबाठा)ला रामराम ठोकला आहे. अनिल जगताप लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेना (उबाठा) गटाने काही दिवसांपूर्वी जिल्हयात खांदेपालट केली होती. यात जिल्हाप्रमुख असलेल्या अनिल जगतापांना सहसंपर्क प्रमुख करित बाजूला करण्यात आले होते.
त्याचे तिव्र पडसाद अनिल जगताप समर्थकांमध्ये उमटले होते. तेंव्हापासून काही तरी ठोस निर्णय घेण्यासाठी जगताप समर्थक त्यांच्यावर दबाव आणत होते. आता अखेर अनिल जगताप यांनी शिवसेना (उबाठा) सोडून शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय जाहीर केला. आपल्या राजकीय भूमिकेच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जगताप म्हणाले १९८६-८७ पासून पदावर असो नसो, शिवसेनेचे काम केले. उपजिल्हाप्रमुख, नंतर जिल्हाप्रमुख झालो.
अनेक कार्यक्रम घेतले. २००९ मध्ये विधानसभेची संधी होती, अर्ध्या रात्री उमेदवारी बदलली. हा पहिला अन्याय होता. २०१९ मध्ये पद काढले, हा दुसरा अन्याय. ४ वर्ष कोणत्याही पदावर नसताना काम करित राहिलो. पुन्हा जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी दिली आणि अचानक पद काढून घेतले. नेमकं विधानसभा जवळ आली कीच माझ्याबाबतीत असं का होतं? कोणी कारणं सांगत नाही. अचानक शक्ती काढून घेण्याची तिसरी वेळ.
पक्षात 'अंधार सेने'च वर्चस्व आहे. माझं पद काढण्यासाठी 'गठुड्या'चे व्यवहार झाले. अशाने पक्ष कधीच वाढणार नाही. अंधारेंनी पक्षात अंधार करायचं ठरवलय. पक्ष संपवायची सुपारी घेऊन निघालेल्या या टोळीला कोणी आवरत नाही. ज्यांनी पक्षासाठी आयुष्य घातलं त्यांची हकालपट्टी केली जाते. अंधार सेनेला शेवटचा रामराम. ९ तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत जाहिर प्रवेश करणार असल्याचे जगताप म्हणाले.