Advertisement

चेतना तिडके अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षक

प्रजापत्र | Monday, 01/01/2024
बातमी शेअर करा

बीड दि.1 (प्रतिनिधी): राज्य शासनाने भारतीय पोलीस सेवा आणि महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या असून अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदी चेतना तिडके यांची नियूक्ती केली आहे. चेतना तिडके सध्या नागपुर येथे उपायुक्त म्हणून कार्यरत होत्या.
अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदी यापूर्वी पंकज कुमावत यांची नियूक्ती करण्यात आली होती. मात्र आता राज्य शासनाने सदरची नियूक्ती रद्द केली आहे. एक कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कुमावत यांना अद्यापही पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्याचवेळी अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधिक्षकपदावर नागपुर येथील उपायुक्त चेतना तिडके यांना नेमण्यात आले आहे.

 

चांगल्या कामाची शिक्षा?
भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी असलेले पंकज कुमावत यांनी त्यांच्या परिविक्षा कालावधीत बीड जिल्ह्यात नेत्रदिपक कामगिरी केली. केजचे सहाय्यक पोलीस अधिक्षक म्हणून त्यांची नियूक्ती असली तरी त्यांनी जिल्हाभरात कारवायांचा धडाका लावला होता. विशेषत: वाळू तस्करांविरोधात तसेच जनावरांच्या तस्करीविरोधातही त्यांनी मोठ्या कारवाया केल्या. गुटखा आणि इतर अवैध धंद्यांना त्यांनी बर्‍यापैकी चाप लावला होता. बीड जिल्हा पोलीस दलात ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी असा आशादायक अधिकारी म्हणून पंकज कुमावत यांची प्रतिमा निर्माण झाली होती. त्यांचा परिविक्षा कालावधी संपल्याने त्यांना नेमकी कोठे नियूक्ती मिळणार याची सर्वांना उत्सूकता होती. त्यातच नोव्हेंबर महिन्यात त्यांना अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधिक्षक म्हणून नियूक्ती देण्यात आली मात्र दोन दिवसातच त्या नियूक्तीला स्थगिती देण्यात आली होती. यावर कळस म्हणजे 15 दिवसांपूर्वी केजच्या सहाय्यक पोलीस अधिक्षकपदी श्री.मिना यांची नियूक्ती करण्यात आली मात्र अद्यापही पंकज कुमावत यांना कोठेही नियूक्ती देण्यात आलेली नाही. पोलीस दलात निरपेक्षपणे आणि निर्भिडपणे काम केल्यावर जर नियूक्तीची प्रतिक्षा करण्याची वेळ येत असेल तर याला चांगल्या कामाची शिक्षा म्हणायचे का? अशी चर्चा सामान्यांमध्ये आहे. 

 

Advertisement

Advertisement