राज्यातील गरजू आणि अर्थिक उत्पन्न कमी असलेल्या नागरिकांना दोळ वेळचं चांगलं जेवण मिळावे यासाठी सरकारमार्फत कमी पैशांत रेशन पुरवले जाते. रेशनचे धान्य खाणाऱ्या सर्वच नागरिकांसाठी आता मोठी बातमी समोर आलीये. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे १ जानेवारीपासून राज्यभरातील रेशन दुकानदारांचा बेमुदत संप सुरू होणारे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, रेशन दुकानदारांच्या विविध मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी देशपातळीवरील ऑल इंडिया फेअर, प्राईस शॉप डिलर्स फेडरेशनने उद्यापासून बेमुदत संप पुकारणार असल्याचे जाहीर केलेय.
या संपामध्ये अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ देखील सहभागी होणार आहेत. त्यामुळे येत्या १ जानेवारीपासून पुण्यासह महाराष्ट्रातील रेशनदुकानदार बेमुदत संपावर जाणार आहेत.
रेशन दुकानदारांच्या मागण्या काय?
रेशन दुकानदारांना मार्जिन इन्कम गॅरंटी ५० हजार करा, टू जी ऐवजी फोरजी मशीन द्या, मार्जिन मनी ३०० रुपये करा, कालबाह्य नियम बदला, आनंदाचा शिधा कायमस्वरुपी करा. तसेच चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करा, यासारख्या मागण्यांसाठी रेशन दुकानदार उद्यापासून संप पुकारणार आहेत.
ऐन नव वर्षांच्या पहिल्याच दिवसापासून रेशनचं दुकान बंद असणार आहे. त्यामुळे सामान्य आणि गरजू नागरिकांची चिंता वाढली आहे. रेशन दुकानदारांच्या या मागण्या सरकार तातडीने पूर्ण करणार का? की यामुळे गरजू नागरिकांना उपाशी पोटी रहावं लागणार असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.