बीड: मराठा समाजाच्या आरक्षणासाठी २० जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा बीडच्या निर्णायक इशारा सभेतून मनोज जरांगे यांनी दिला.
मराठा आरक्षणाच्या संदर्भाने मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन रविवारी (दि.२४ ) संपत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी बीडमध्ये मनोज जरांगे यांची निर्णायक इशारा सभा आयोजित करण्यात आली होती. शहराच्या वळण रस्त्यावरील संभाजी महाराज चौकालगतच्या पाटील मैदानात या सभेसाठी लाखोंच्या संख्येने मराठा समाज जमला होता.
या सभेतून जरांगे यांनी पुढील आंदोलनाची दिशा स्पष्ट केली. २० जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला.
सभेत जरांगे म्हणाले की हा जमलेला समाज म्हणजे मराठयांचा महाप्रलय आहे. हिंसाचाराच्या नावाखाली निष्पाप मराठे गुंतविले, पण भिणार तो मराठा कसला? आमच्या समाजाला विनाकारण डाग लावला. निष्पाप पोरांना गुंतविण्याचे षडयंत्र सरकारने केले. मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. हा मराठा कधीच कोणाच्या घरावर जाऊ शकत नाही. यांनीच यांचे घर जाळले आणि आमच्या पोरांची नावं घेतली असे जरांगे म्हणाले. मी सरकारला चंपावती नगरीतून विनंती करतोय, सरकार शहाणपणाची भूमिका घ्या, भुजबळ एकटयाचे ऐकून अन्याय कराल तर जड जाईल. मराठा समाज खवळला तर तुमचा राजकीय अस्तीत्वाचा सुपडा साफ होईल. नविन नविन प्रयोग करु नका, ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या, नाहीतर पुढचं आंदोलन झेपणार नाहीआहे असे जरांगे म्हणाले.
महाराष्ट्रातील मराठा समाज हाच माझा परिवार आहे. मी स्वतःला या परिवारासाठी समर्पित केलय. ही एकजुटिची ताकत वाया जाऊ देणार नाही. मी मॅनेज होत नाही हीच सरकारची अडचण आहे. मराठा समाजाच्या लेकरांच्या चेहऱ्यावर हसू बघायच हेच माझं स्वप्न आहे. मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या, त्यांना आरक्षण मागतो म्हणून ते मला शत्रू मानायलेत. आमच्या लेकरांचे मुडदे पडायलेत. सरकार मराठा समाजाची फसवणूक करतय. सरकार गांभीर्याने घेत नाही. सरकारला वठणीवर आणण्याची ताकत मराठ्यांमध्ये आहे. मराठ्यांची लेकरं आत्महत्या करतायत, आणि सरकारला लाज वाटत नाही. सरकारला मराठा जात संपवायची आहे. मराठा समाजाला डवचू नका असे आवाहन जरांगे यांनी सरकारला केले.
आंदोलन करायचय, पण ते शांततेत करायच आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटायच नाही. आम्हाला कुठं जायची हौस नाही, पण आम्ही सहन तरी किती दिवस करायचं? आम्हाला सुध्दा मर्यादा आहेत असे सांगून जरांगे यांनी पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट केली.
तत्पूर्वी बीड शहरातून मनोज जरांगे यांची मोठी रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून अण्णाभाऊ साठे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयांना अभिवादन करित बार्शीनाका मार्गे रॅली सभास्थळी पोहचली. रॅली दरम्यान ठिकठिकाणी मनोज जरांगे यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून आणि सभास्थळी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली.
-----
पुन्हा भुजबळ यांच्यावर टीका
या सभेत मनोज जरांगे यांनी पुन्हा छगन भुजबळ यांच्यावर टीका केली. मी छगन भुजबळला उलथापालथा करतो, माझ्या नादी कशाला लागायचं? मी शांत बसलो तरी माझ्याबद्दल काहीही बोलतो, भुजबळ महाराष्ट्राला कलंक आहेत. आरक्षण मिळुद्या मग कचका दाखवितो, माझ्या नादी लागू नका, मी लई बेक्कार माणूस आहे असे जरांगे म्हणाले.
---