शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात सहा निकाल लावण्यासाठी अधिक लागणार असल्याने ३ आठवड्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी विधीमंडळाकडून करण्यात आली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारीपर्यंतची मुदत वाढवून दिली आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी पुर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मात्र या प्रकरणात ३४ याचिकांचे सहा गटांत वर्गीकरण केल्यामुळे ६ निकाल लागणार आहेत.
२१ ते ३१ डिसेंबरपर्यंत या निकालाचे लेखन अशक्य आहे. त्यामुळे विधीमंडळाकडून वेळ मागवून घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आज या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विधीमंडळाची ही मागणी मान्य करत १० जानेवारीपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणाचा १० जानेवारीपर्यंत निर्णय द्या.. असे आदेश कोर्टाने दिले आहेत.