नागपूर दि. १५-बीड जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या ३० तारखेला मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून झालेल्या हिंसाचाराचा प्रश्न आज विधानसभेत चर्चेला येणार आहे. आ.संदीप क्षीरसागर,आ.रोहित पवार आणि इतरांनी मांडलेली लक्षवेधी सूचना स्वीकृत करण्यात आली असून या सूचनेद्वारे पोलिसांच्या दुर्लक्षावर प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यासंदर्भाने काय उत्तर देतात याकडे राज्याचे लक्ष असेल. त्यामुळे आता बीड जिल्हा पोलीस दलातील अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबरला मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून मोठा हिंसाचार झाला होता.यात आ.संदीप क्षीरसागर यांचे घर,राष्ट्रवादीचे कार्यालय,जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यालय,सुभाष राऊत यांचे हॉटेल जाळण्यात आले होते.त्यासोबतच शिवाजीराव पंडित यांच्या घरावर देखील जमाव गेला होता तसेच इतर काही ठिकाणी तोडफोड झाली होती.तसेच माजलगावात आ.प्रकाश सोळंके यांचे घर जाळण्यात आले होते. हे सारे होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली अशी टीका आणि आरोप सर्व स्तरातून झाला होता.
आता त्याच संदर्भाने आ.संदीप क्षीरसागर आणि आ.रोहित पवार व इतरांनी उपस्थित केलेली लक्षवेधी स्वीकृत करण्यात आली असून त्यावर येत्या काही तासात चर्चा होणे अपेक्षित आहे.आता यात गहृमंत्री नेमके काय उत्तर देतात आणि याचे खापर पोलिसांमधील कोणावर पडते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे अनेक अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली आहे.