Advertisement

मी मरायला घाबरत नाही,

प्रजापत्र | Monday, 11/12/2023
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि. ११ (प्रतिनिधी ) : मी समाजालाच मायबाप मानले आहे. त्यामुळे त्यांच्याशी गद्दारी करणार नाही. मी मरायला घाबरत नाही. मला गोरगरीब मराठ्यांच्या चेहऱ्यावर आरक्षण मिळाल्यानंतरच हसू पाहायचं आहे असे प्रतिपादन मनोज जरांगे  यांनी केले .
अंबाजोगाई तालुक्यात सोमवारी मनोज जरांगे यांची सभा झाली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जरांगे यांनी खुर्चीवर बसूनच भाषण केले. यावेळी जरांगे यांनी आरक्षणामुळे गोरगरीब मराठ्यांचे कल्याण होणार आहे. आम्ही ७० वर्षांपासून आरक्षणाची वाट बघतली आहे. हे आरक्षण तेव्हाच मिळालं असत. तर आज मराठे जगाच्या पाठीवर समृद्ध झाले असते. पण षडयंत्र करून आमचे आरक्षण दिले नाही. मात्र आता ते षडयंत्र चालणार नाही. समाजाच्या जीवावरच मी आरक्षणासाठी जीवाची बाजी लावीत आहे. सध्या शरीर साथ देत नाही,मात्र ही आरामाची  वेळ नाही. विजयाचा क्षण जवळ आला आहे. त्यामुळे आता आराम नाही. मी मरायला घाबरत नाही. मला समाजाला आरक्षण मिळवूनच द्यायचे आहे. मी चार तास देखील झोपत नाही. त्यामुळे आता आपली एकजूट मोडू देऊ नका. मराठा पुढाऱ्यांना विनंती आहे की यात राजकारण आणू नका. आरक्षण हा मराठा समाजाचा हक्क आहे, आणि तो आपण मिळवणारच आहोत . जीव धरणीला टेकला तरी आरक्षणाचा लढा सोडणार नाही असे जरांगे म्हणाले.
आपल्या लेकरांना पुन्हा अशी संधी येणार नाही . आपल्या लेकरांचे वाटोळे होत आहे. लेकरांना अधिकारी करण्याचं गोरगरिबांच स्वप्न अर्धवट आहे. त्यासाठी मायबाप रात्रंदिवस कष्ट करीत आहेत . त्यामुळे आता आरक्षण मिळालेच पाहिजे . आपल्या लाखो लेकरांचे आयुष्य उद्धवस्त झाले आहेत. त्यामुळे नेत्यांना जातीपेक्षा मोठे मानू नका . जातच संपली तर आपल्याला कोणी विचारणार नाही. जात वाचली पाहिजे यासाठी जागृती करा असे देखील जरांगे यांनी सांगितले.

----
तर पुढचे आंदोलन जड जाईल
सरकारने मराठा समाजाचे आंदोलन गांभीर्याने घ्यावे. आमच्या सभेला लाखो लोक येतात ते आपल्या लेकरांच्या वेदना घेऊन येत आहेत. त्या वेदना समजून घ्या . सरकारने याकडे गांभीर्याने पहिले नाही आणि एकट्या छगन भुजबळ याच्या सांगण्यावर काही निर्णय घेतला तर अवघड होईल. मग सरकारला आमचे पुढचे आंदोलन जड जाईल. छगन भुजबळ यांची नियत चांगली नाही, सरकारने त्यांना समज द्यावी . गावागावात मराठा ओबीसी एकत्र राहावेत अशीच आमची इच्छा आहे. वेळ आली तर छगन भुजबळ यांना जशास तसे उत्तर देऊ , त्याला आमचा नाईलाज आहे . आम्ही प्रत्येक सभेत शांततेचे आवाहन करतोय. आताही तीच विनंती आहे. गोंधळात आयुष्य जाऊ देऊ नका. दूरदृष्टी ठेवा. आरडाओरडा करून समाजाचे वाटोळे करू नका असे आम्ही समजला सांगतोय. आणि भुजबळ प्रत्येक ठिकाणी जातीय तेढ निर्माण करीत आहेत असेही जरांगे म्हणाले.

---

Advertisement

Advertisement