मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास केवळ 'अपघात' म्हणून न पाहता, त्यातील तांत्रिक त्रुटी आणि कंपनीच्या निष्काळजीपणाची चौकशी व्हावी, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. "या विमान कंपनीत डीजीसीएचे माजी अधिकारी कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचे तपास अहवाल खोटे असू शकतात," असा खळबळजनक संशय रोहित पवारांनी व्यक्त केला आहे.
रोहित पवारांनी 'व्हीएसआर व्हेंचर्स' या कंपनीच्या जागतिक रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "परदेशातही या कंपनीने एका घटनेचा अहवाल दिला नव्हता, ज्यामुळे युरोपियन एजन्सींनी या कंपनीचे परवाने रद्द केले होते. मात्र, तरीही या कंपनीची विमाने भारतात उडविली जात आहेत. अजित दादांचा मृत्यू होऊनही या कंपनीवर अद्याप बंदी का घातली जात नाही?" असा सवाल त्यांनी केला.
पायलटवर दबाव आणि सुरक्षेची ऐशीतैशी
पायलटसाठी आवश्यक असलेला १२ तासांचा 'गॅप' पाळला जात नाही. इन्सेंटीव्ह कापण्याची किंवा नोकरीवरून काढण्याची धमकी देऊन वैमानिकांना विमानावर बसविले जाते. तसेच उड्डाणाच्या तासांमध्ये फेरफार करणे आणि विमानातील संभाषणाची रेकॉर्ड करणारी सीव्हीआर यंत्रणा जाणीवपूर्वक बंद ठेवली जाते. कॉस्ट कटिंगच्या नावाखाली विमानाची योग्य देखभाल केली जात नव्हती, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी दिला. यासाठी आपण विमान कंपनी व्हीएसआरच्या माजी पायलट, डीजीसीएचे काही अधिकारी यांची मदत घेतल्याचे रोहित पवारांनी स्पष्ट केले.
आयएलएस सिस्टीमचे वास्तव
बारामती विमानतळावर अद्ययावत आयएलएस सिस्टीम नसल्याची चर्चा होत असली तरी, रोहित पवारांनी २०२३ मधील मुंबई विमानतळावरील अपघाताचा दाखला दिला. "मुंबईत अद्ययावत यंत्रणा असतानाही या कंपनीच्या विमानाचा अपघात झाला होता, त्याचा रिपोर्ट अद्याप का आला नाही? तो रिपोर्ट दाबला गेला नसता, तर कदाचित अजित दादांचा अपघात वाचवता आला असता," असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. रोहित पवारांनी मागणी केली आहे की, या कंपनीच्या सर्व विमानांचे आणि गेल्या १० दिवसांच्या सीसीटीव्ही फुटेजचे सखोल ऑडिट व्हावे, जेणेकरून यामागील खरे रहस्य समोर येईल.
बारामतीच्या आयएलएस सिस्टीमच्या नसण्यावर अनेक तज्ञ चर्चा करत होते. या विमानतळावर यापूर्वी अनेक उद्योगपती उतरलेले आहेत. या विमानाचा मुंबई विमानतळावर अपघात झाला होता. तिथे तर अद्ययावत आयएलएस सिस्टीम होती, मग का झाला. २०२३ मध्ये हा अपघात झाला होता. याचा रिपोर्ट बनविण्यात आला का, त्या अपघाताचा अद्याप रिपोर्ट आलेला नाही. अजित पवारांच्या अपघातानंतर जेव्हा देशभरातून चर्चा सुरु झाल्या तेव्हा डीजीसीएने हालचाली केल्या. हा रिपोर्ट दाबण्यात आला होता. तो का दाबला गेला, सरकारपर्यंत आला असता तर त्यावर काहीतरी कारवाई झाली असती. असे झाले असते तर अजित पवारांचा अपघात वाचविता आला असता, असे रोहित पवार यांनी सांगितले.

