बीड- मराठा आरक्षणाला माझा कधीही विरोध नव्हता. मराठा आरक्षणाला मी जाहीर पाठिंबा देतो. मराठा आरक्षणासाठी वेळ आली तर मी आमदारकीचा राजीनामाही देईन, अशी घोषणाच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी केली आहे. बीडच्या माजलगावमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली. त्यामुळे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार का? अशी चर्चा आता रंगली आहे.
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते बाबूराव पोटभरे यांनी मराठा आरक्षण अधिकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आमदार प्रकाश सोळंके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मराठा आंदोलकांनी प्रकाश सोळंके यांच्या घराची जाळपोळ करण्यात आली होती. त्यानंतर पहिल्यांदाच सोळंके यांनी जाहीर कार्यक्रमात भाग घेतला.
यावेळी या सभेला संबोधित करतानाच प्रकाश सोळंके यांनी ही घोषणा केली. सध्या उभ्या महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण झाली आहे. मराठा समाजाची सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक स्थिती बिकट आहे. एकत्रित पारंपरिक कुटुंब पद्धती राहिली नाही. जमीन तेवढीच आहे, कुटुंब वाढले आहे. गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. आर्थिक साधन निर्माण झाले पाहिजे. त्यामुळे आरक्षणाची मागणी रास्त आहे, असं प्रकाश सोळंके यांनी म्हटलं आहे.