बीड-बीड जिल्ह्यात झालेल्या हिंसाचार प्रकरणात आता कोणाची विकेट पडणार याच्या चर्चांनी बीड जिल्हा पोलीस दलातील वातावरण तापले आहे. नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात या हिंसाचाराच्या संदर्भाने लक्षवेधी तसेच तारांकित प्रश्न देखील उपस्थित करण्यात आले आहेत. याची उत्तरे काय द्यायची यावर सध्या पोलीस दलात मंथन सुरु आहे.
बीड जिल्ह्यात ३० ऑक्टोबर रोजी हिंसाचाराची घटना घडली होती.या घटनेत लोकप्रतिनिधींच्या घरासोबत,हॉटेल,पक्ष कार्यालयाला हल्लेखोरांनी टार्गेट केले होते. यानंतर ३०० पेक्षा अधिक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले.मात्र अद्याप ही काही टोळी प्रमुख फरार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी देताना या घटनेचा तपास वर्षभर सुरु राहणार असल्याचे सूतवाच केले होते.दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता आता लोकप्रतिनिधींनी याची गांभीर्याने दखल घेतली असून हिवाळी अधिवेशनात याचे चांगलेच पडसाद उमटणार असल्याचे चित्र आहे.
काही विधानसभा सदस्यांनी उपस्थित केलेली लक्षवेधी येत्या आठवड्यात सभागृहात चर्चेला येणे अपेक्षित आहे.त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडत आहे. उत्तरे नेमकी काय द्यायची यावर जिल्हा पोलीस दलात मंथन सुरु आहे. तर यात नेमका कोणाचा बळी जातो? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.लोकप्रतिनिधींना स्वतःच्या घराला करण्यात आलेले 'लक्ष्य' चांगलेच जिव्हारी लागलेले असून पोलिसांना परिस्थिती हाताळताना आलेले अपयश याचा सर्व हिशोब आता सभागृहात द्यावा लागणार आहे.त्यामुळे दिवस-रात्र सध्या जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठांसह सर्व अधिकारी उत्तर देण्याची पूर्वतयारी करत असल्याची माहिती आहे.एकंदरीत हे अधिवेशन जिल्हयासाठी वातावरण तापविणारे ठरणार असल्याचे चित्र आहे.
बातमी शेअर करा