तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदी रेवंत रेड्डी विराजमान झाले आहेत. तेलंगणातील हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमात काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन यांनी काँग्रेस नेते रेवंत रेड्डी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. तेलंगणाच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी शिवकुमार यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.
रेवंत रेड्डी हे तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. रेवंत रेड्डी तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री असतील. २०१३ मध्ये तेलंगणाच्या स्थापनेनंतर काँग्रेस पहिल्यांदाच सत्तेत आली आहे. आतापर्यंत केवळ चंद्रशेखर राव दोनदा मुख्यमंत्री झाले होते. मात्र, यावेळी त्याना हॅट्ट्रिक करण्यात अपयश आलं. रेवंत रेड्डींनी चंद्रशेखर रावांचं स्वप्न धुळीला मिळवलं आणि काँग्रेसकडे सत्ता खेचून आणली.